बातम्या
“मत विकू नका, स्वाभिमान जपा” – सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांचे आवाहन
By nisha patil - 11/10/2025 4:22:56 PM
Share This News:
“मत विकू नका, स्वाभिमान जपा” – सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांचे आवाहन
आजरा (हसन तकीलदार): आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सोशल मीडियावर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची पोस्टर्स झळकू लागली आहेत. मात्र, या निवडणुकीत “एक कोटी रुपये नगराध्यक्षपदासाठी आणि २० ते २५ लाख रुपये नगरसेवकपदासाठी खर्च करावे लागतात” अशी चर्चा सुरू असून, ही परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे (सर) यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, “आज मताचा हक्क बजावण्याऐवजी आपण मत विकत आहोत. जर आपण मत आणि स्वाभिमान पैशासाठी विकला, तर मग पाण्यासाठी टँकर विकत घ्यावे लागतील, रस्त्यावर खड्डे, कचरा आणि चिखल सहन करावा लागेल, आणि आरोग्य धोक्यात येईल. कारण आपण विकत घेतलेला नेता आपल्यासाठी नाही, तर आपल्या पैशासाठी काम करतो.”
शिंदे पुढे म्हणाले, “आपण अंगठी, साडी, नोटा, पैंजण यांना भुलून मत विकतो आणि नंतर पाच वर्षे आंदोलने करत फिरतो. त्यामुळे आता तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक शक्तीचा वापर करून प्रामाणिक, निःस्वार्थ प्रतिनिधींना संधी देणे गरजेचे आहे.”
“छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र असल्याने आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे मताचा मान राखला पाहिजे. आपलं मत हक्कानं द्या, पण विकू नका,” असे आवाहन त्यांनी आजऱ्यातील जनतेला केले.
“मत विकू नका, स्वाभिमान जपा” – सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांचे आवाहन
|