ग्रामीण
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 8 ऑगस्ट 2025 रोजी स्मृतिदिन या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.
By Administrator - 6/8/2025 5:38:27 PM
Share This News:
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 8 ऑगस्ट 2025 रोजी स्मृतिदिन या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.
समाजातील बहुजनांच्या शिक्षणासाठी आयुष्य् खर्ची घालणारे महाराष्ट्राच्या 12 जिल्हयात व कर्नाटकातील 01 जिल्हयात ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व् म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे . अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करीत त्यांनी जीवनप्रवास सुरु केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून त्यांनी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरु केले. बापूजी साळुंखे एक कर्मयोगी व शिक्षणप्रेमी नेतृत्व् होते. त्यांचे विचार व कार्य महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
दिनांक 9 जून 1919 रोजी सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील रामापूर या छोटयाशा गावात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा जन्म् झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद ,पुणे ,सातारा ,रायगड कोल्हापूर, सोलापूर सांगली ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,पेण, बेळगाव अशा जिल्ह्यांमध्ये ज्ञान मंदिरे उघडून येथील सर्वसामान्य जनतेच्या शिक्षणाची सोय केली. हे सर्व करीत असताना त्यांच्या नशिबी मान-अपमान, कष्ट, उपासमार हे सर्व आले पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचविण्याचे कार्य बंद पडू दिले नाही. त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत बापूजींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे .
“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार ” हया ध्येयवादाने प्रेरीत होऊन त्यांनी 1954 साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणाने माणूस ज्ञानी व सुसंस्कारी व्हावा यासाठीच त्यांनी शिक्षणप्रसाराचे सतीच वाण हाती घेतले. खेडयामध्ये वाडया, वस्त्या व आदिवासी पाडयामध्ये जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्व् पटवून दिले. सत्य्, चारित्र्य , प्रामाणिकपणा, पिळवणूकीस आळा, सेवा व त्याग ही मानवी जीवनातील मौलिक तत्वे समाजमनात शिक्षणाव्दारे रुजविली जात आहेत. आज या संस्थेची 407 शैक्षणिक संकुले शाळा, महाविद्यालये बालवाडी ते पदव्युतर शिक्षण दहा हजार गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने भारताची तरुण पिढी आत्मविश्वासाने घडवित आहेत.
आज या संस्थेचे अनेक विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य्, विज्ञान, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात चमकत आहेत. उच्च् पदावर शासकीय सेवेत आहेत. त्यामुळेच आज ही शिक्षणसंस्था महाराष्ट्रातील एक नामंकित व गुणवंत शिक्षणसंस्था होत आहे.
हरे राम, हरे राम, राम राम हरे रहे , हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
या बापूजीनी स्वत: रचलेल्या प्रार्थनेने संस्थेच्या शाळांतील दिवसाची सुरुवात होते. या प्रार्थनेव्दारे अखिल मानवजातीला मानव्याचा व सर्वधर्म समभावाचे शिक्षण दिले जाते. बापूजी धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्यावर स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वरी, भगवदगीता यांचा खूप प्रभाव होता.
बापूजी प्रार्थना, भजन तालासुरात म्हणत असत. ईश्वराची उपासना आणि प्रार्थनेमुळे आत्मशुध्दी होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. बापूजींच्या शैक्षणिक कार्यात त्यांच्या पत्नी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच बापूजी तेरा जिल्हयात संस्कारकेंद्रे उभी करु शकले. ग्रामीण भागात राहाणाऱ्या समाजातील वंचित घटकापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचविण्याच्या केलेल्या कार्यामुळे
शासन व विविध संस्था यांनी बापूजींना मानपत्र दिले. महाराष्ट्र शासनातर्फे 'दलित मित्र' म्हणून त्यांना गौरवण्यात आले शिवाजी विद्यापीठाकडून 'डी.लीट ' ही पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बापूजींच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन शासनानेही त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा अशी अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब , संस्थेच्या सचिव मा. प्राचार्या सौ शुभांगी मुरलीधर गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे हे सर्व संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसमवेत कार्यरत आहेत. संस्थेतील सर्व जाती धर्मातील गुरुदेव कार्यकर्त्यांची बापूजींनी एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेतली होती. त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचा मिळून एक मोठा संस्था परिवार निर्माण झाला आहे व या परिवाराचे श्रद्धास्थान म्हणून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना प्रत्येकाच्या हृदयात एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढण्यासाठी आपले सर्व जीवन खर्ची घालणारे बापूजी म्हणजे शिक्षणक्षेत्रातील एक सोनेरी पान, ज्ञानगंगेतील दीपस्तंभ, शिक्षणक्रांतीचे कर्मवीर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा वटवृक्ष, आधारवड , महाराष्ट्रातील शिक्षण क्रांतीवीर अशा कितीतरी उपाधी त्यांना लागू पडतात.
शिक्षण हा मानवाचा केंद्रबिंदू आहे. शिक्षणामुळे मानवाचे जीवन घडते ही बापूजींच्या विचाराची धारणा होती. गोरगरीब व बहुजनांच्या घरात ज्ञानाचा प्रकाश पाडणारा हा ज्ञानसूर्य दिनांक 8 ऑगस्ट 1987 रोजी मावळला, पण आपल्या कार्यकर्तृत्वाने हजारो कुटूंबाची घरे प्रकाशमान करुन बापूजी अमर झाले आहेत. बापूजींच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम .
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 8 ऑगस्ट 2025 रोजी स्मृतिदिन या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.
|