बातम्या
*डॉ.देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर
By nisha patil - 10/23/2026 4:53:23 PM
Share This News:
*डॉ.देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर
*१३ नोव्हेंबरला नागपूर येथे होणार गौरव
*आजरा(हसन तकीलदार) इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आजरा शाखेचे सेक्रेटरी डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय व समर्पित सेवा तसेच 'आयएमए' या मातृसंस्थेसाठी विविध स्तरांवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड २०२५-२६' जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार नागपूर येथील नॉर्थ अंबाझरी रोडवरील 'आयएमए हाऊस' येथे आयोजित राज्यस्तरीय 'मास्टाकॉन २०२६' (MASTACON 2026) परिषदेत प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता होणाऱ्या विशेष सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. अनिल देशपांडे यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबतचे अधिकृत पत्र राज्य शाखेकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे.
डॉ. अनिल देशपांडे यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातील सेवेतच नव्हे, तर आजरा परिसरातील सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले आहे. विविध क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान आहे.डॉ. देशपांडे हे आजरा अर्बन बँकेचे माजी चेअरमन, आजरा शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन तसेच आजऱ्यातील नामांकित जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत राज्य पातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आजरा शहराबरोबरच वैद्यकीय क्षेत्र आणि सहकार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*डॉ.देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर
|