शैक्षणिक
डॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड
By nisha patil - 5/12/2025 11:57:15 AM
Share This News:
कोल्हापूर, ३ डिसेंबर: हरियाणातील पंचकुला येथे येत्या ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल -२०२५ मधील युवा वैज्ञानिक परिषदेसाठी (यंग सायंटिस्ट कॉन्फरन्स) शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर मोरे यांची निवड झाली आहे.
डॉ. क्रांतिवीर मोरे सौरऊर्जा क्षेत्राच्या अनुषंगाने संशोधन करीत आहेत. त्यांनी विविध प्रकारची नॅनोसंमिश्रे तयार केली असून त्यांच्यापासून कमीत कमी तापमानामध्ये आणि अत्यल्प वेळेत सौरऊर्जा उत्पादन करणारे उपकरण बनविले आहे. यामध्ये त्यांनी कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईड नॅनोमुलद्रव्यांचा वापर केला आहे.
हे उपकरण सुलभपणे हाताळता येते. सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना देणाऱ्या या संशोधनामुळेच डॉ. मोरे यांची या परिषदेसाठी निवड झाली आहे. डॉ. मोरे यांचे वीसहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित असून सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांच्या नावावर आहेत. नुकतेच त्यांना भारत सरकारकडून कॉपीराईटदेखील प्राप्त झाला आहे. याच वर्षी त्यांनी स्वतःची स्टार्टअप प्रशिक्षण कंपनी स्थापन केली असून विद्यापीठाच्या नवोन्मेष केंद्रात नोंदणी केली आहे.
इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे घोषवाक्य "आत्मनिर्भर भारत: विज्ञानातून समृद्धीकडे" असे असून देशातील वैज्ञानिक नवप्रतिभा, सर्जनशीलता यांना एकत्र आणून आंतरविद्याशाखीय संवाद आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. परिषदेत नामवंत वैज्ञानिक, नोबेल पुरस्कार विजेते तसेच प्रख्यात वैज्ञानिक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवड
|