शैक्षणिक
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. प्रतापसिंह वरूटे एएसआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड
By nisha patil - 2/9/2025 11:51:02 PM
Share This News:
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. प्रतापसिंह वरूटे एएसआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड
कोल्हापूर / प्रतिनिधी : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आणि कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे ऍडव्हायजरी मेंबर डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (ASI) या देशातील शल्यचिकित्सकांच्या सर्वोच्च संघटनेच्या उपाध्यक्ष (२०२६) व अध्यक्ष (२०२७) या पदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे.
८६ वर्षांच्या इतिहासात पश्चिम महाराष्ट्रातून या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणारे ते पहिलेच सर्जन ठरले आहेत. सध्या ते डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागात कार्यरत असून, २०२२ पासून ते ASI चे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत होते. देशभरातील ४४ हजार सदस्य असलेल्या या संघटनेचे नेतृत्व करण्याचा बहुमान आता त्यांना मिळाला आहे.
मागील दोन दशकांपासून डॉ. वरूटे यांनी सर्जरी विषयातील अनेक परिषद, कार्यशाळा, थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपण उपक्रम आयोजित केले आहेत. २०१६ मधील अखिल महाराष्ट्र शल्यचिकित्सकांची परिषद तसेच कोविड काळात ४० हून अधिक ऑनलाईन कार्यशाळा हे त्यांच्या कामाचे महत्त्वाचे टप्पे ठरले. याच कार्याची दखल घेऊन त्यांना २०२३ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो तर्फे मानद FRCS पदवी बहाल करण्यात आली.
त्यांनी यापूर्वी २०१७-१८ या काळात महाराष्ट्र सर्जिकल सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले असून, ASI चे सलग तीन वर्षे (२०२२-२४) सचिव म्हणून काम पाहिले आहे.
डॉ. वरूटे यांच्या निवडीबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. रेखा ख्यालाप्पा यांच्यासह कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मानसिंग आडनाईक व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच डॉ. आप्पासाहेब मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वसुंधरा वरूटे यांनीही शुभेच्छा दिल्या.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. प्रतापसिंह वरूटे एएसआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड
|