बातम्या
आजरा ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीला डॉ. सौम्या विनियन यांची भेट
By nisha patil - 12/9/2025 12:24:11 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):-हैद्राबादच्या आय. सी. एस. एस. आर. संस्थेच्या शास्त्रज्ञा डॉ. सौम्या विनियन व त्यांच्या पथकाने आजरा येथील आजरा ऍग्रो प्रोड्यूसर कपंनीला नुकतीच भेट देऊन येथील उत्पादन व घनसाळ भात पिकाविषयी माहिती घेऊन उपस्थितासोबत चर्चा केली.
आजरा तालुक्यातील घनसाळ भाताला जी. आय. मानांकन मिळाल्यापासून शेतकऱ्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिस्थितीमध्ये काय बदल झाले, रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध झाल्या याची प्रत्यक्ष शेतकऱ्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे घनसाळ भात शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतीविषयक माहितीही घेण्यात आलेबद्दल शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांनी सांगितले.
डॉ. सौम्या विनियन यांनी आजरा ऍग्रो कंपनी कार्यालयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी शेती उत्पादन, घनसाळ भात, मजूर तसेच इतर बाबींविषयी सखोल माहिती घेतली. यावेळी संभाजी इंजल यांनी प्रास्ताविक केले तर निवृत्ती कांबळे यांनी पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
अध्यक्ष संभाजीराव सावंत यांनी सन 2008 पासून घनसाळ भात पिकाच्या वाटचालीचा इतिहास मांडत नामशेष होत असलेल्या घनसाळीचे क्षेत्र वाढवणेसाठी, उत्पादकता वाढवणेसाठी भारत सरकारकडे त्याची नोंदणी करणे त्याचबरोबर शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर मिळावून देणे याबाबतचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, सन 2008 मध्ये घनसाळच्या एक किलो तांदळाचा दर 50/₹इतका होता तोच आता 110ते 120₹पर्यंत झाला आहे. प्रचार व प्रसिद्धी केल्यामुळे परदेशातही याची मागणी होताना दिसत आहे. बाहेरील लोक खरेदीसाठी व निर्यातीसाठी प्रयत्नात आहेत. याबरोबरच लागवडीमध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत याबाबतही सांगण्यात आले.
रोप लागण, भांगलण, कापणी, मळणीसाठी महिला मजुरांची टंचाई असलेने लागण कामे वेळेत होत नाहीत त्यामुळे याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनावर मर्यादा येत आहेत. यासाठी रोप लागणीची मशीन घनसाळ पिकवणाऱ्या प्रत्येक गावात किमान एक तरी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली.अशा अनेक अडचणी यावेळी मांडण्यात आल्या या सर्व बाबी डॉ. सौम्या विनियन यांनी आपल्या अहवालात मांडून सदर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे सांगितले. तसेच घनसाळीचे क्षेत्र व उत्पादन वाढविणेबाबत सूचना करण्यात आल्या. कंपनी संचालकाकडून अचूक व सविस्तर माहिती सादर केल्याबद्दल डॉ. विनियन यांनी आभार मानले. यावेळी तालुका कृषिअधिकारी भूषण पाटील, गट विकास अधिकारी दिनेश शेट्ये, कंपनीचे संचालक आप्पा पावले, हिंदुराव कालेकर कृषी खात्याचे क्षेत्रीय कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते
आजरा ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीला डॉ. सौम्या विनियन यांची भेट
|