बातम्या

१०० एकर ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना डॉ. युवराज येडूरे यांचा लाखोंचा मदतीचा हात!

Dr Yuvraj Yedures helping hand worth lakhs to farmers


By nisha patil - 11/16/2026 7:46:14 PM
Share This News:



१०० एकर ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना डॉ. युवराज येडूरे यांचा लाखोंचा मदतीचा हात!

केवळ पाहणी नाही, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत; महावितरणला मनसे देणार कायदेशीर नोटीस

गारगोटी | प्रतिनिधी निळपण, दारवाड व म्हसवे (ता. भुदरगड) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे सुमारे १०० एकर ऊस क्षेत्र जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते डॉ. युवराज येडूरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. मात्र, केवळ पाहणी करून आश्वासन न देता स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाधित शेतकऱ्यांना लाखो रुपयांची प्रत्यक्ष आर्थिक मदत करण्यात आली.

महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; कायदेशीर नोटीस देणार!

घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान महावितरणच्या विद्युत वाहिन्या अत्यंत खाली लोंबकळत असल्याचे तसेच संबंधित डीपी नादुरुस्त असल्याने त्यामधून स्पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आले. या विद्युत यंत्रणेतील त्रुटींमुळेच आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच परिसरात विद्युत दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वारंवार अशा घटना घडत असतानाही महावितरण प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणला कायदेशीर नोटीस देण्यात येणार असून संबंधित विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या ऊस बिलातील कपात करू नये!

या दुर्घटनेत नुकसान झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी केली आहे. साखर कारखान्यांकडे गाळपासाठी ऊस पाठविताना शेतकऱ्यांच्या बिलातून नियमितपणे केली जाणारी कपात बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत करू नये, अशी मागणी त्यांनी मनसेकडे केली आहे. या मागणीसाठी संबंधित साखर कारखान्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. येडूरे यांनी सांगितले.

तातडीने शासकीय पंचनामे करण्याची मागणी

नुकसानग्रस्त ऊस क्षेत्राचे तातडीने शासकीय पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी. तहसीलदार व तलाठी यांनी विलंब न करता घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची नोंद करावी आणि पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. युवराज येडूरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संकटात केवळ पाहणी करून परत जाणे ही आमची भूमिका नाही. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधार मिळाला पाहिजे, या उद्देशाने संस्थेच्या व मनसेच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शासनाकडून किती मदत मिळेल हे सांगता येत नाही; मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. यापुढेही त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि आर्थिक पुनर्वसनासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.

शेतकऱ्यांनीही आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. शेतकरी एकजूट हीच त्यांची खरी ताकद असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढण्याची आज गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, सुशांत पाटील तसेच शेतकरी संदीप पाटील, बाबुराव देसाई, मोहन चौगले, मनोज देसाई, भगतसिंग पाटील, नानासो पाटील, संतोष देसाई, संदीप देसाई यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते


१०० एकर ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना डॉ. युवराज येडूरे यांचा लाखोंचा मदतीचा हात!
Total Views: 87