बातम्या
आजरा ग्रामीण रुग्णालयात लसींचा कोणताही तुडवडा नाही-डॉ. सुश्रुत जमदाडे
By nisha patil - 10/21/2025 12:32:13 PM
Share This News:
आजरा ग्रामीण रुग्णालयात लसींचा कोणताही तुडवडा नाही-डॉ. सुश्रुत जमदाडे
आजरा(हसन तकीलदार):-रुग्णाला आलेल्या रिअॅक्शन्समुळे पुढील उपचारासाठी पाठविले; रुग्णालयात लशींचा कोणताही तुटवडा नाही – डॉ. सुश्रृत जमदाडे
आजरा, ता. २०/१०/२०२५ मृत्युंजय ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे अत्यावश्यक लसींच्या कमतरतेबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीकडून डॉ. सुश्रृत जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. जमदाडे यांनी सदर प्रकरणाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांनी सांगितले की, कु. प्रथमेश बयाजी कोकरे रा. आवंडी धनगरवाडा याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णास ए. आर. व्ही. लस टेस्ट केली असता रिअॅक्शन्स आली. त्यामुळे दुसरी वायल उघडून दुसऱ्या हातावर टेस्ट केली असता पुन्हा रिअॅक्शन्स दिसल्याने रुग्णाला तातडीने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पाठविण्यात आले. तेथून पुढे रुग्णाला जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले.
यावेळी डॉ. जमदाडे म्हणाले की, “रुग्णाला गंभीर रिअॅक्शन्स आल्याने तातडीने पुढील उपचार व्हावेत म्हणून काळजीपूर्वक निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात सर्व प्रकारच्या लशी व तातडीच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.”
लसींची कमतरता असल्याचा उल्लेख रुग्णाच्या नातेवाईकांकडून गैरसमजुतीतून झाला असून, ग्रामीण रुग्णालयात लशींचा कोणताही तुटवडा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सचिव पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव रामचंद्र पंडीत, मिनीन डिसोझा, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, मदन तानवडे आदिजण उपस्थित होते. **परंतु यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे*
आजरा ग्रामीण रुग्णालयात लसींचा कोणताही तुडवडा नाही-डॉ. सुश्रुत जमदाडे
|