विशेष बातम्या

आजरा साखर कारखान्यात वाहनचालकांचे प्रबोधन व रिफ्लेक्टर वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Driver awareness and reflector distribution program


By nisha patil - 11/20/2025 3:21:36 PM
Share This News:



आजरा साखर कारखान्यात वाहनचालकांचे प्रबोधन व रिफ्लेक्टर वाटपाचा कार्यक्रम संपन्न
 

आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रक्षा व वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ट्रक व ट्रॅक्टर वाहनधारकांना रिफ्लेक्टर वाटप करून प्रबोधन करण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी वाहतुकीचे नियम पाळून कायदेशीर कारवाईची कटुता टाळण्याचे आवाहन केले.
       

स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. के. सावंत यांनी केले तर प्रास्ताविक कारखान्याचे मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई यांनी केले. यावेळी शेतीधिकारी देसाई म्हणाले की, वाहतुकीचे नियम पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या एका चुकीमुळे एखादा कुटुंब उध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे पोलीस अधिकारी  ज्या सूचना करतील त्या सूचनांचे पालन केले पाहीजे. कोणतीही अडचण आली तर संपर्क साधण्याचे आवाहन केले. नियम किंवा कायदा मोडून वाहन चालवू नका. असे यावेळी त्यांनी सांगितले.
   

 ऊस वाहतूकदारांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक नागेश यमगर म्हणाले की, रस्ता वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपण शून्य अपघात यानुसार काम केले पाहिजे. यासाठी आपले वाहन सुस्थितीत ठेवणे, वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर लावणे, स्पीकरचा मोठा आवाज करून वाहन चालवू नका, मद्यसेवन करून वाहन चालवू नका, तुमच्या एका चुकीमुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. खासकरून ट्रॅक्टर चालकांनी आपले वाहन चालवताना दोन्ही बाजूला बघून एका बाजूने ट्रॅक्टर चालवावे. त्याचप्रमाणे वाहन पार्किंग करताना योग्य ठिकाणी वाहन पार्क करा. जेणेकरून इतर वाहनांना व नागरिकांना त्याचा अडथळा होणार नाही. वाहनांचा विमा, कागदपत्रे व्यवस्थित असले पाहिजे.

वाहनांच्या दिव्यांची योग्य काळजी घ्या. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळला तर कारवाईची कटुता टाळता येईल असे यावेळी प्रबोधन केले. यावेळी ऊसपुरवठा अधिकारी अजित(राजू)देसाई, वाहतूक शाखेचे पोलीस संजय जाधव, पोलीस हवालदार अनंत देसाई, कार्यलयीन अधीक्षक अनिल देसाई, संदीप कांबळे, तुकाराम मोळे, सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, बाळासाहेब तांबेकर तसेच ट्रक, ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.


आजरा साखर कारखान्यात वाहनचालकांचे प्रबोधन व रिफ्लेक्टर वाटपाचा कार्यक्रम संपन्न
Total Views: 511