ताज्या बातम्या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘ड्राय डे’ लागू; १३ जानेवारी सायंकाळपासून दारूविक्री बंद
By nisha patil - 1/13/2026 11:42:58 AM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार, मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून मद्यविक्री पूर्णतः बंद राहणार आहे. हा बंद शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहील.
याशिवाय, सोमवार, १९ जानेवारी २०२६ (मतमोजणीचा दिवस) देखील राज्यात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
हा आदेश केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित नसून, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्या सर्व ठिकाणी तो लागू राहणार आहे.
या कालावधीत देशी-विदेशी दारूची दुकाने, वाईन शॉप्स, बिअर बार, परमिट रूम्स तसेच हॉटेल व क्लबमधील मद्यपुरवठा करणारे सर्व विभाग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक काळात मतदारांवर कोणताही अनुचित प्रभाव पडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्बंध लागू केले आहेत.
दरम्यान, या काळात छुप्या पद्धतीने मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या भरारी पथकांकडून शहरासह सीमावर्ती भागात कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘ड्राय डे’ लागू; १३ जानेवारी सायंकाळपासून दारूविक्री बंद
|