शैक्षणिक

डिजिटल शिक्षणाची दिशा ठरवणारे ई-कन्टेन्ट अपरिहार्य

E content is essential to set the direction of digital education


By nisha patil - 7/1/2026 4:58:25 PM
Share This News:



डिजिटल युगात गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी ई-कन्टेन्टची निर्मिती ही काळाची अपरिहार्य गरज बनली असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाचे संचालक अभिजित रेडेकर यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या पार्श्वभूमीवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी ई-कन्टेन्ट विकासाचे कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने, पी.एम.-उषा अंतर्गत आयोजित “डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ ई-कन्टेन्ट फॉर ऑनलाईन अँड मूक्स” या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अजय साळी होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रेडेकर म्हणाले की, आज तंत्रज्ञान साक्षरता ही ऐच्छिक न राहता मूलभूत गरज बनली आहे. स्वयं व महा-स्वयं यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय सहभाग घेतल्यास शिक्षण अधिक प्रभावी व व्यापक होऊ शकते. पारंपरिक शिक्षणपद्धतींमध्ये डिजिटल शिक्षणामुळे आमूलाग्र बदल होत असून, विद्यार्थी-केंद्रित आणि संवादात्मक ई-कन्टेन्ट निर्मिती ही नव्या शिक्षण व्यवस्थेची दिशा ठरत आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अजय साळी यांनी सांगितले की, भविष्यात शिक्षणासाठी केवळ वर्गखोलीपुरते शिक्षण मर्यादित राहणार नाही. बदलती पिढी वेगाने डिजिटल शिक्षणाकडे वळत असून, त्या अनुषंगाने प्रभावी, परिणामकारक व गुणवत्तापूर्ण ई-कन्टेन्ट विकसित करणे ही शिक्षकांसमोरील मोठी जबाबदारी आहे.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अहिल्यानगर येथील नॉलेज ब्रीज फाउंडेशनचे प्रशिक्षक भूषण कुलकर्णी यांनी डिजिटल साधनांचा शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करता येईल, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान समजून घेत ते कौशल्याने वापरणे ही काळाची शैक्षणिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका डॉ. नितीन रणदिवे यांनी मांडली. पाहुण्यांची ओळख नाझिया मुल्लाणी, सूत्रसंचालन डॉ. नगिना माळी, तर आभार प्रदर्शन संदीप थिटे यांनी केले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, प्रा. डॉ. नितीन माळी, डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. सूर्यकांत गायकवाड, डॉ. राम चट्टे, प्रा. कांचन खराडे, डॉ. प्रमोद कोळी, डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. करीम मुल्ला, डॉ. रोहिणी भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



डिजिटल शिक्षणाची दिशा ठरवणारे ई-कन्टेन्ट अपरिहार्य
Total Views: 37