बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक दसरा उत्साहात साजरा

Eco friendly Dussehra celebrated with enthusiasm at Vivekananda College


By nisha patil - 1/10/2025 3:44:05 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक दसरा उत्साहात साजरा

 कोल्हापूर (प्रतिनिधी) 1 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे दसरा सण पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन गणितशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉलेज परिसरात उत्साह, आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकाच वेळी अनुभवायला मिळाला.

“दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा” ही उक्ती सर्वत्र प्रचलित आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सोनेरी दिवसाला आपट्याची पाने वाटण्याची परंपरा आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे आणि पर्यावरणीय संकटामुळे शहर परिसरात आपट्याची व कांचन वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. दसऱ्याच्या दिवशी कांचन वृक्षांच्या फांद्या तोडून त्यांची विक्री केली जाते, परिणामी या वृक्षांवरही संकट कोसळू लागले आहे.

 पार्श्वभूमीवर विवेकानंद कॉलेजमध्ये पारंपरिकतेला जपत पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यात आला. वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष उपक्रम हाती घेत, रद्दी कागद, जुन्या लग्नपत्रिका, शुभेच्छा पत्रे आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून आपट्याच्या पानांच्या आकाराची कृत्रिम पाने तयार केली. त्यावर पर्यावरणपूरक संदेशही लिहिण्यात आले. विशेष म्हणजे या पानांच्या आत वेगवेगळ्या प्रकारच्या बिया लावण्यात आल्या असून ती पाने जिथे पडतील तिथून नवीन झाडे उगवतील. त्यामुळे दसरा सणासोबतच वृक्षलागवडीचाही संदेश यातून दिला गेला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांनी केले. विद्यार्थिनी सिद्धी कराळे आणि आसावरी केसरकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास माननीय प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या अभिनव उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांनी एकमुखाने कौतुक केले. पर्यावरणपूरक दसऱ्याचे हे वेगळेपण समाजासाठी एक आदर्श ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


विवेकानंद कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक दसरा उत्साहात साजरा
Total Views: 65