बातम्या
मुख्याध्यापक संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत ; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
By nisha patil - 9/29/2025 12:03:24 AM
Share This News:
*मुख्याध्यापक संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत ; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर*
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची ८१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शिवाजी पार्क येथील राजर्षि शाहू महाराज सभागृहा मध्ये खेळीमेळीत पार पडली असली तरी विरोधकांनी प्रश्न विचारून वर्मावर बोट ठेवल्याने सभासदांची समजून काढताना सत्ताधाऱ्यांसमोर पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसले .
मुख्याध्यापक संघाचे सचिव आर . वाय . पाटील आणि अध्यक्ष राहूल पवार यांनी कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांचा समाचार घेवून समयोचित उत्तर देण्याचा प्रयत्न केला . मुख्याध्यापक शिवाजी कोरवी, दत्ता पाटील, अजित रणदिवे, खंडेराव जगदाळे, पंडित पोवार, सुरेश संकपाळ यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सभागृहाचे चांगलेच लक्ष वेधले . मागील सभेचे इतिवृत्त वाचून झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय वाचून दाखवताना सभासदांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात झाल्यानंतर सचिव आर. वाय. पाटील यांनी अत्यंत संयमाने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला . अध्यक्ष राहूल पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . काही प्रश्नांची उत्तरे देताना अध्यक्ष राहूल पवार यांचा संयम ढळल्याचे दिसून आले तरीही त्यांनी शिवाजी कोरवी यांच्या अडचणीत आणू पहाणाऱ्या प्रश्नास न्याय देण्याचा प्रयत्न केला . पंडीत पोवार यांनी टेलीफोन बील, पीएमसी बँक यासंदर्भातील प्रश्नांना सताधाऱ्यांनी उत्तर देण्याचा आग्रह धरला . उत्तराचे समाधान न झाल्याने त्यांच्या प्रश्नास संघाने काय उपाय योजना केल्यास खर्चावर नियंत्रण आणता येईल याचे तौलनिक उत्तरही सांगून टाकले . एकंदरीत सभागृहातील संचालक मंडळांनी बरेच प्रश्न लेखी मागितले असल्याकारणाने उत्तरांची पूर्वतयारी झालेली दिसून आली . ऐनवेळच्या प्रश्नांनी मात्र काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले मात्र सचिव आर. वाय. पाटील, अध्यक्ष राहूल पवार, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सल्लागार संजय पाटील यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही . प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दुखवटा ठरावाचे वाचन केले .डॉ. रजनीकांत पोवार यांनी सूत्रसंचालन तर मिलिंद पांगिरेकर यांनी आभार प्रदर्शन केले . याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे आजी माजी संचालक तसेच शहरातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते .
मुख्याध्यापक संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत ; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
|