बातम्या

कागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

Efforts underway to have Kagal and Gadhinglaj talukas


By nisha patil - 12/11/2026 10:41:51 PM
Share This News:



कागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
       
मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाच्या दुष्काळ निवारण समितीची बैठक

             
कोल्हापूर, दि. १२:  कागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंगळवारी दि. १७  मुंबईत मंत्रिमंडळामध्ये दुष्काळ निवारण समितीची बैठक होणार आहे, असेही ते म्हणाले.
              
कोल्हापूरात मंत्री श्री. मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.

         
गडहिंग्लजमध्ये गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, "गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी गडहिंग्लजमध्ये विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. दिवाळीच्या काळात अभ्यंगस्नान सुद्धा आंदोलनस्थळी करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला. मी आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी, तसेच; काही दिवसांपूर्वी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर सचिव श्रीमती सिंघल यांनी सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आदेश दिलेले आहेत.

कागल आणि गडहिंग्लज तालुक्यातील मंडळनिहाय २०% गावांच्या पिकांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. त्याचा अहवाल या दोन्हीही तालुक्याच्या तहसीलदारांनी कृषी सहाय्यकांकडून घेऊन पाठवलेला आहे. त्याची प्रत माझ्याकडेही दिलेली आहे. येत्या मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या दुष्काळ निवारण समितीची बैठक होणार आहे.  त्या बैठकीला मी स्वतःही उपस्थित राहणार आहे. 
           
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल आणि विशेषतः गडहिंग्लज हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचे वचन परवाच भेटीदरम्यान महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी आम्हाला दिले आहे. ही माहीती  परवा दिवशीच आंदोलकांना दिली होती. तुम्ही घरी जाऊन दिवाळी साजरी करा, असे आवाहनही केले होते. हे जर झाले नाही तर  तुम्ही पुन्हा आंदोलन करू शकता, असेही सांगितले होते. दरम्यान; गेले आठवडाभर दिवाळीच्या सुट्ट्याच होत्या. येत्या मंगळवारी हा प्रश्न उपस्थित करून कागल आणि गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याचा प्रयत्न करू.


कागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
Total Views: 50