बातम्या
आजऱ्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
By Administrator - 3/21/2026 4:30:13 PM
Share This News:
आजऱ्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची लक्षणीय उपस्थिती
आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यात ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. मौलाना वासिम लमतुरे यांनी जीवनात चांगले वर्तन करून एकमेकांना मदत करीत माणुसकी जपण्याचे तसेच आपली कमाई ही हलाल असावी हराम कमाई नसावी या तत्वावर आधारित प्रवचन दिले.हाफिज तौफिक काकतिकर यांनी नमाज पठण केले तर हाफिज अब्दुलगफार लमतुरे यांनी कुतबा पठण केले. नमाज पठणानंतर मौलाना काकतिकर यांनी विश्वशांती, बंधूत्व आणि अल्लाहच्या कृतज्ञतेसाठी दुआ (प्रार्थना) केली.
ईद उल फित्र (रमजान ईद)हा मुस्लिम बांधवांचा एक महत्वाचा धार्मिक सण आहे जो पवित्र रमजान महिन्याच्या रोजे समाप्तीनंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा सण आनंद, कृतज्ञता, बंधूभावाचे प्रतीक असून यात विशेष नमाज, जकात -सदका (दान धर्म ), नवीन कपडे, गोरगरीब गरजूना मदत, गळाभेट तसेच शिरकुर्मा (शेवया )सारख्या गोडपदार्थाचा आस्वाद घेतला जातो. पवित्र रमजान महिन्यात महिनाभर रोजे (उपवास)धरून अल्लाहप्रती आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मुस्लिम बांधव साजरा करतात. हा सण म्हणजे केवळ उपवासाची सांगता नसून सहनशक्ती, शिस्त आणि गरीब श्रीमंत असा भेदभाव विसरून बंधुभाव जपण्याचा संदेश देतो. ईदच्या दिवशी तसेच रमजान महिन्यात गोरगरिबांना अन्न धान्य, पैसे, कपडे लत्ते इ. वस्तू फितरा म्हणून दान करणे अनिवार्य मानले जाते.
पोलीस प्रशासनाचा कौतुकास्पद उपक्रम उपक्रम:-ईदच्या दिवशी पोलीस विभाग व तहसील विभाग यांचेमार्फत ईद साठी आलेल्या मुस्लिम बांधवाना पुष्प देऊन स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. लहान मुलेसुद्धा पोलीस बांधवाना हस्तालोंदन करून शुभेच्छा देत होते. ईदगाह मैदानावर इतकी गर्दी असूनही कोठेही ढकलाढकली नाही, दंगा नाही की गोंधळ नाही. कोणतीही यंत्रणा नसताना किंवा स्वयंसेवक नसताना सर्वजण अनुशासन पाळीत एका रांगेत नमाज पठण करून कबरस्तान मध्ये जाऊन आपापल्या मृत नातेवाईकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दुआ पठण करून शिरकूरम्याचा आस्वाद घेण्यासाठी आपापल्या घरी निघून गेले. यावेळी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक युवराज लोंढे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आजऱ्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
|