बातम्या
मालमत्तेच्या वादातून मुलाकडून वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या
By nisha patil - 12/20/2025 11:53:40 AM
Share This News:
हुपरी :- मालमत्तेच्या वाटणीच्या कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी (ता. हातकणंगले) येथे आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
या घटनेत विजयमाला नारायण भोसले (वय 70) आणि नारायण गणपतराव भोसले (वय 82) यांचा मृत्यू झाला असून, सुनील नारायण भोसले (वय 48) असे आरोपी मुलाचे नाव आहे. खून केल्यानंतर सुनीलने स्वतः हुपरी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
मालमत्तेच्या वाटणीवरून सतत वाद
हुपरी येथील महावीरनगर, अल्फा लाईन गल्लीत भोसले कुटुंब वास्तव्यास आहे. नारायण भोसले यांना तीन मुले असून, थोरले व दुसरे मुलगे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. धाकटा मुलगा सुनील आई-वडिलांसोबत राहत होता. मात्र घराच्या वाटणीवरून त्याचा आई-वडिलांशी सतत वाद सुरू होता.
सततच्या वादाला कंटाळून सुनीलची पत्नी वर्षभरापासून मुलांसह बेळगाव येथे माहेरी राहत आहे. वाटणीला विलंब होत असल्याचा राग मनात धरून सुनीलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पहाटे पाणी भरताना हल्ला
घटनेच्या दिवशी पहाटे नळाला पाणी आल्याने विजयमाला भोसले पाणी भरत असताना सुनीलने घरातील काचेची पेटी फोडून काचेचा तुकडा व विळतीचे पाते घेत त्यांच्यावर हल्ला केला. तोंडावर व हातावर गंभीर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर सुनीलने झोपेत असलेल्या वडील नारायण भोसले यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार करत हाताची नस कापली. यात त्यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
खून करून बाहेर कडी, मित्रांना दिली कबुली
खून केल्यानंतर सुनीलने घराला बाहेरून कडी लावली आणि निर्विकारपणे बाहेर उभा राहिला. रस्त्याने जाणाऱ्या मित्रांना त्याने आई-वडिलांना संपवल्याचे सांगितले. त्यानंतर तो थेट पोलिस ठाण्यात हजर झाला.
वरिष्ठ पोलिसांकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञांचे पथकही दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मालमत्तेच्या वादातून मुलाकडून वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या
|