राजकीय
कोल्हापूरच्या जीडीपीमध्ये प्रचंड भर घालण्यासाठी महायुतीला निवडून द्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
By Administrator - 10/1/2026 11:43:49 AM
Share This News:
कोल्हापूर दि. १०:
कोल्हापूर शहराच्या जीडीपीमध्ये प्रचंड भर घालण्यासाठी महायुतीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महायुतीचे सर्वच नगरसेवक हे काम जबाबदारीने करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. नऊ, १७, १९, २० मधील जाहीर सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, भाजपाचे महेश जाधव या प्रमुखांसह प्रभागनिहाय उमेदवार व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास महायुतीच करेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे द्या. महायुतीचे सर्वच नगरसेवक शहराच्या नियोजनबद्ध विकासासह गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील. महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून कोल्हापुरात साक्षात विकासगंगा अवतरेल.
चौकट..
असा वाढणार कोल्हापूरचा जीडीपी.....!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाल्यानंतर आणि करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवी मंदिर तीर्थस्थळ विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर एका खाजगी कंपनीने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये कोल्हापूर शहराचा किती मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे याचा आढावा घेतला. तसेच; फ्लोएटिंग म्हणजेच ये-जा करणाऱ्या अशा तरंगत्या लोकसंख्येचाही आढावा घेतला. या सगळ्या लोकांच्या व्यवस्थेसाठी काय केलं पाहिजे याचा एक संभाव्य आराखडा त्या कंपनीने दिलेला आहे. हॉटेल्सची व्यवस्था लागणार आहे. पार्किंगची व्यवस्था लागणार आहे. लोकांना राहण्यासाठी फ्लॅट्स लागणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराचा जीडीपी निश्चितच वाढणार आहे. ही सर्व अनुषंगिक कामे करून शहराचा जीडीपी वाढवायाचे महत्त्वाचे काम महायुतीच करू शकते. त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूरच्या जीडीपीमध्ये प्रचंड भर घालण्यासाठी महायुतीला निवडून द्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
|