बातम्या
“जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम; १३ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २०३६ उमेदवारी अर्ज दाखल”
By nisha patil - 11/18/2025 4:23:44 PM
Share This News:
“जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम; १३ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २०३६ उमेदवारी अर्ज दाखल”
जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः धबधबा पाहायला मिळाला असून एकूण २०३६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी १६९ तर नगरसेवक पदासाठी तब्बल १८६७ अर्ज दाखल झाल्याने स्थानिक राजकारणात सर्रास सुरू असलेली शक्तीपरीक्षा आता उघडपणे दिसू लागली आहे. सोमवारी झालेल्या छाननीनंतर कोण कोणत्या प्रभागातून माघारी घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रत्येक ठिकाणी राजकीय गोटांचे हालचाली प्रचंड वेगाने सुरू झाल्या आहेत.
कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, हुपरी, मुरगुड, आजरा, चंदगड आणि हातकणंगले येथे उमेदवारांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे वातावरण तापले आहे. यंदा सर्वाधिक चुरस गडहिंग्लजमध्ये पाहायला मिळाली असून नगराध्यक्षपदासाठी तब्बल २७ अर्ज दाखल झाले आहेत. तर पन्हाळा आणि मलकापूर येथे सर्वात कमी म्हणजे फक्त सहा अर्ज मिळाले असून या दोन्ही ठिकाणी तुलनेने शांतपणे निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी १५ आणि नगरसेवकांसाठी १७३ अर्ज, शिरोळमध्ये ९ आणि ११०, जयसिंगपूरमध्ये १२ आणि २०१, पेठवडगावमध्ये ९ आणि ७७, पन्हाळ्यात ६ आणि ८१, हातकणंगलेमध्ये १३ आणि १५१, हुपरीत ८ आणि १०५, चंदगडमध्ये १६ आणि १२५ असे अर्ज दाखल झाले आहेत. मुरगुडमध्ये प्रचंड उत्साह असून नगराध्यक्षपदासाठी १५ आणि नगरसेवकांसाठी तब्बल २२३ अर्ज जमा झाले आहेत. आजरामध्ये १८ आणि १३५ तर मलकापूरमध्ये ६ आणि ८४ अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये कागल नगरपालिकेनेही मोठी चुरस अनुभवली असून फक्त २३ जागांसाठी तब्बल २२७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. स्थानिक राजकारणातील वेगवान बदल, गटांमधील स्पर्धा आणि सत्तेवरील पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक वातावरण तापले असून यंदाची निवडणूक ही अभूतपूर्व आणि सर्वाधिक चर्चेची ठरणार हे स्पष्ट झाले आहे.
“जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम; १३ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २०३६ उमेदवारी अर्ज दाखल”
|