बातम्या

कागल एमआयडीसी’मधील वीज उपकेंद्र लवकर पूर्ण करणार- संचालक धनंजय औंढेकर

Electricity Substation in Kagal MIDC to be Completed Soon


By nisha patil - 10/23/2026 4:56:32 PM
Share This News:



कागल एमआयडीसी’मधील वीज उपकेंद्र लवकर पूर्ण करणार- संचालक धनंजय औंढेकर

जिल्ह्यातील औद्योगिक संघटना प्रतिनिधींसोबत संवाद

कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर २०२६ : औद्योगिक ग्राहक हा महावितरणच्या महसूलाचा मुख्य कणा आहे त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगांच्या विस्ताराकरिता, कागल एमआयडीसी येथील सी ब्लॉक मधील २० एमव्हीए क्षमतेच्या महावितरणच्या उपकेंद्राचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल. कागल एमआयडीसी येथील महापारेषणच्या १०० एमव्हीए क्षमतेच्या अति उच्चदाब केंद्राच्या जागेचा विषय लवकरच मार्गी लावणार. तर इचलकरंजी येथील शहापूर व नाईकमळा येथे प्रस्तावित  प्रत्येकी २० एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राच्या जागा अधिग्रहणाचे काम जलद गतीने पूर्ण करून, काम लवकर सुरु करणार, अशी माहिती महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.

महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ऊर्जा शक्ति सभागृहात (दि. १७) जिल्ह्यातील औद्योगिक संघटना प्रतिनिधींच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. स्वप्निल काटकर, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे मोहन कुशिरे, विठ्ठल पाटील, शंतनू गायकवाड, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरचे बदाम पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संजय देशिंगे, अमोल यादव , कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन उद्यमनगरचे कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे, सीआयआय साउथ चॅप्टरचे वीरेंद्र पाटील, पाॅवर लूम असोसिएशनचे महम्मद रफिक खानापुरे, सतीश कोष्टी, पी. डी. सोलगे तसेच अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर), अमित बोकील (सांगली) या बैठकीस उपस्थित होते.

संचालक (संचालन) श्री. औंढेकर पुढे म्हणाले की, औद्योगिक ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी स्थानिक वीजयंत्रणेच्या आवश्यक सक्षमीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर आहे. राज्यातील सौर ऊर्जा क्रांतीमुळे औद्योगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा बोझा कमी होत आहे. यासह विविध उपाययोजनांनी वीज खरेदीमध्ये बचत सुरू असल्याने घरगुतीसह औद्योगिक व व्यावसायिक वीज दर कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

या संवाद कार्यक्रमात जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांच्या विविध मागण्या व अपेक्षांवर चर्चा झाली. यावेळी संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने आवश्यक देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना उपस्थित सर्व अभियंत्यांना दिल्या. इचलकरंजी विभागातील उद्योगांच्या सुरळीत वीस पुरवठ्याच्या आवश्यक देखभाल व दुरुस्ती कामासाठी शिडी गाडीची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे संचालक श्री. औंढेकर यांनी सांगितले. 


कागल एमआयडीसी’मधील वीज उपकेंद्र लवकर पूर्ण करणार- संचालक धनंजय औंढेकर
Total Views: 53