राजकीय

‘स्मार्ट’ योजनेतून वीज ग्राहकांना मिळणार सौर ऊर्जेचे अतिरिक्त अनुदान कोल्हापूर परिमंडलातील पात्र ग्राहकांपैकी  ३९,२५२ ग्राहकांना मिळणार लाभ

Electricity consumers will get additional subsidy on solar energy through the Smart scheme


By nisha patil - 5/15/2026 2:35:01 PM
Share This News:



‘स्मार्ट’ योजनेतून वीज ग्राहकांना मिळणार सौर ऊर्जेचे अतिरिक्त अनुदान कोल्हापूर परिमंडलातील पात्र ग्राहकांपैकी  ३९,२५२ ग्राहकांना मिळणार लाभ

 

कोल्हापूर/सांगली, दि. १४ मे २०२६ : दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना वीजबिलातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (SMART- स्मार्ट) सोलार योजना” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानासोबत राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान दिले जात आहे. या योजनेकरिता पात्र ग्राहकांमधून कोल्हापूरातील २४,३१३ तर सांगलीतील १४,९३९ ग्राहकांना लाभ मिळणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ वीज ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.

 

स्मार्ट योजनेअंतर्गत राज्यातील ५ लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनुदानासोबत राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान दिले जात आहे. स्मार्ट योजनेचा लाभ राज्यातील दारिद्र्यरेषेखालील १ लाख ५४ हजार ६२२ ग्राहक तसेच १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ३ लाख ४५ हजार ३७८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त ३९,२५२ ग्राहकांचा समावेश होणार आहे. स्मार्ट योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना ३५ टक्के, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांना ३० टक्के तर सर्वसाधारण गटाला २० टक्के अतिरिक्त अनुदान राज्य शासनाकडून दिले जाणार आहे.

 

१ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी अंदाजे ५० हजार रुपये खर्च गृहीत धरल्यास केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये अनुदान मिळत आहे. याव्यतिरिक्त दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना राज्य शासनाकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान मिळणार असून त्यांना केवळ २ हजार ५०० रुपये खर्च करावे लागतील. इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांसाठी ग्राहक हिस्सा ५ ते १० हजार रुपयांदरम्यान राहणार आहे. स्मार्ट योजनेत सहभागी होण्याकरिता ग्राहकाकडे वैध वीजजोडणी असणे आवश्यक असून त्यांनी यापूर्वी कोणत्याही सौर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.  

 

या योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जाणार असून याकरिता स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. सौर प्रकल्प बसवल्यानंतर पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपन्यांवर राहणार आहे. मार्च २०२७ पर्यंत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार  ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महावितरणमार्फत मे २०२६ हा महिना ‘सोलर महिना’ म्हणून साजरा केला जात असून या महिन्यात जास्तीत जास्त ग्राहकांनी या ‘स्मार्ट’ योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

 


‘स्मार्ट’ योजनेतून वीज ग्राहकांना मिळणार सौर ऊर्जेचे अतिरिक्त अनुदान कोल्हापूर परिमंडलातील पात्र ग्राहकांपैकी  ३९,२५२ ग्राहकांना मिळणार लाभ
Total Views: 14