विशेष बातम्या
कारागृहात राखीचा भावनिक सोहळा : भागीरथी महिला संस्थेचं अनोखं रक्षाबंधन
By nisha patil - 8/8/2025 6:21:43 PM
Share This News:
कारागृहात राखीचा भावनिक सोहळा : भागीरथी महिला संस्थेचं अनोखं रक्षाबंधन
कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट – रक्षाबंधनाचा पवित्र सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचं प्रतीक. याच नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेत, भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांना राखी बांधण्याचा भावनिक कार्यक्रम आज पार पडला.
गुन्हे अनाहुतपणे घडले असले तरी शिक्षा भोगताना मनात असणारं पश्चात्तापाचं भावविश्व, घरच्यांची ओढ आणि खास करून बहिणीच्या मायेची उणीव बंदीजनांना सतावते. याच वेळी "आम्हीही तुमच्या बहिणी आहोत" असा भाव ठेवत भागीरथी संस्थेच्या महिलांनी प्रेम, माया आणि आपुलकीचा रेशमी धागा या कैद्यांच्या मनावर गुंफला.
कार्यक्रमात कैद्यांचे अश्रू अनावर झाले. अनेकांनी राखी बांधून घेतानाचा तो क्षण आयुष्यातील अविस्मरणीय ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या.
हा उपक्रम धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या सौ. अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. यामध्ये संस्थेच्या संचालिका शिवानी पाटील, सदस्य सुलोचना नार्वेकर, अभिजीत यादव, ऐश्वर्या देसाई, सीमा पालकर, स्नेहल खाडे यांच्यासह अनेक सदस्य सहभागी होते.
कार्यक्रमास तुरूंग अधीक्षक विवेक झेंडे आणि वरिष्ठ तुरूंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांची उपस्थिती लाभली. देवकर यांनी तुरूंगातील कैद्यांकडून तयार होणाऱ्या प्रसाद, गणेश मूर्ती व इतर उत्पादनांची माहिती दिली आणि भागीरथी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
संस्थेच्या सतत सामाजिक भान ठेवून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे, कारागृहातील बंदींनाही समाजातील मायेचं वळण मिळावं, यासाठीचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं.
कारागृहात राखीचा भावनिक सोहळा : भागीरथी महिला संस्थेचं अनोखं रक्षाबंधन
|