विशेष बातम्या

क्षयरोग निर्मूलनासाठी समुदाय सहभागावर भर द्या, निक्षय मित्र वाढवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Emphasize community participation to eradicate tuberculosis


By nisha patil - 4/12/2025 11:18:56 AM
Share This News:



कोल्हापूर -: क्षयरोग निर्मूलनासाठी समुदाय सहभागावर भर देत त्यांना आवश्यक ती मदत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टीबी फोरमची बैठक पार पडली. जिल्हा क्षयरोग केंद्र आणि सी.पी.आर. रुग्णालय यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

या फोरमचा उद्देश क्षयरोग निर्मूलनासाठी समुदायाचा सहभाग वाढवणे आणि रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून नवीन धोरणे ठरवणे हा आहे. जिल्ह्यात क्षयमुक्त ग्रामपंचायतींची संख्या वाढत असून ऑक्टोबर अखेर १,०२५ पैकी ४८२ ग्रामपंचायती पात्र ठरत आहेत. डिसेंबर अखेर अंतिम निवड निश्चित होणार आहे. २०२४च्या तुलनेत यावर्षी क्षयमुक्त ग्रामपंचायत वाढण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींना सुवर्ण, १७५ ग्रामपंचायतींना रौप्य आणि २७० ग्रामपंचायतींना कास्य पदक मिळाले आहेत अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली. 

बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाला औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या (एमडीआर) क्षयरुग्णांसाठी सीपीआर रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्याच्या सूचना दिल्या. पुढील १५ दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात यावा, तसेच जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी अन्यत्र जाऊ नयेत यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.  

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाच क्षयरुग्ण दत्तक घेत त्यांच्या पोषण किटचे वितरण बैठकीदरम्यान केले. इंडोकाउंट फाउंडेशनने १,३०० क्षयरुग्ण दत्तक घेऊन ३,९०० पोषण किट उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी फाउंडेशनचे प्रतिनिधी अमोल पाटील यांचे आभार मानले. याशिवाय घाटगे पाटील इंडस्ट्रीज (उचगाव) यांनी १,००० किट, लक्ष्मी पंप कागल एमआयडीसीने ९०० किट, तसेच निक्षय मैफिल-जाणीव फाउंडेशनने ७८ किट दिल्या आहेत. त्यामुळे जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान सर्व क्षयरुग्णांना पोषण किट वितरित करण्यात आले आहेत.  

आगामी वर्षातील गरज भागविण्यासाठी किट वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या. तसेच प्रत्येक आस्थापनात ‘निक्षय मित्र’ तयार करून रुग्णांना मदत करण्यासाठी मोहीम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.  

या बैठकीत टीबीशी संबंधित इतर आजारांच्या प्रतिबंधक कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. भिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, टीबी पीएलएचआयव्ही नेटवर्कच्या दीपा शिपूरकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  


क्षयरोग निर्मूलनासाठी समुदाय सहभागावर भर द्या, निक्षय मित्र वाढवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 12