व्यवसाय

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे रोजगाराची संधी

Employment opportunities i


By nisha patil - 8/14/2025 5:02:59 PM
Share This News:



जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे रोजगाराची संधी

कोल्हापूर, : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (HOME BASED CAREGIVER) या क्षेत्रात युवक युवतींना रोजगाराची संधी असून किमान 10 वी पास, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज भरावा व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

 सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ऑन जॉब ट्रेनिंग सह). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए /एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससीनर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

इस्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत विभागाकडून केली जाणार आहे, मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही असणार आहे. पात्र उमेदवारांना  1 लाख 61 हजार 586 रुपये  पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. ०२३१-२५४५६७७) येथे संपर्क साधावा.


जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे रोजगाराची संधी
Total Views: 199