बातम्या
महावितरणमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 9/15/2026 9:03:50 PM
Share This News:
महावितरण अभियंत्यांमुळे प्रत्येक घर प्रकाशमान - स्वप्नील काटकर
महावितरणमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर २०२६ : महावितरणचे अभियंते त्यांच्या जनमित्रांसह ऊन, वारा, वादळ, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिन कार्यरत असतात. यामुळे वीज ग्राहकांना चांगली सुविधा देणे व प्रत्येक घर प्रकाशमान ठेवणे महावितरणला शक्य होते. कोल्हापूर परिमंडलातील अभियंते उत्साही असून ते मनापासून काम करतात, त्यामुळेच कोल्हापूर परिमंडल अनेक मापदंडात राज्यात अव्वल आहे, असे गौरव उद्गार महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी काढले.
महावितरणच्या कोल्हापूर मंडलाकडून अभियंता दिनानिमित्त भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पुनम रोकडे (पायाभूत आराखडा), सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंते सुनील गवळी, म्हसू मिसाळ, अभिजित सिकणीस, दत्तात्रय भणगे, विजयकुमार आडके, वैभव गोंदील, संजय पवार, सागर चालीकवार, नीरज आहुजा, अजित अस्वले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची उपस्थिती होती.
यावेळी कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे म्हणाले ‘अभियंता हा विविध प्रश्नांवर त्याच्या कल्पक बुध्दीने उत्तर शोधत असतो. त्यामुळे मानवी जीवन अधिक सूखकर होते. सध्या वीज ग्राहकांना बसविण्यात येणार स्मार्ट मीटर हे अधिक सक्षम व अचूक आहेत. यामुळे वीज ग्राहकांचे त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण राहणार आहे. हे आधूनिक तंत्रज्ञान प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. कोल्हापूर जिल्ह्यास राज्यात अव्वल ठेवण्याच्या दृष्टीने 100 टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित अभियंत्यांना केले.
यावेळी ‘विद्युत क्षेत्रातील आव्हाणे’ यावर डॉ. मिर खादीर आलम यांचे तर ‘ताणतणाव व्यवस्थापन’ यावर प्रा.संदीप पवार यांचे व्याख्यान झाले. सुत्रसंचालन प्रमुख लिपीक शकिल महात यांनी तर आभार व्यवस्थापक (मासं) दिपक भोसले यांनी मानले. यावेळी महावितरण मधील अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर मंडलाच्या मानव संसाधन विभागाने विशेष प्रयत्न केले.
महावितरणमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा
|