बातम्या
कोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणूक, औक्षण व पुस्तकवर्षावाने उजळला ‘प्रवेशोत्सव’
By nisha patil - 6/16/2025 3:21:30 PM
Share This News:
कोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणूक, औक्षण व पुस्तकवर्षावाने उजळला ‘प्रवेशोत्सव’
आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर संकुलात आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी एक आनंदोत्सव ठरला. सदरबाजार येथील साने गुरुजी बालक मंदिर, सावित्री श्रीधर विद्यालय आणि कोरगांवकर हायस्कूल या तीनही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावाने, सवाद्य मिरवणुकीने, औक्षणाने व पेढे वाटपाने स्वागत करत पारंपरिक आणि उत्साहवर्धक पद्धतीने ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला.
मुख्य प्रवेशद्वारापासून शाळेच्या इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. दोन्ही बाजूंनी पालक आणि शिक्षकांनी गुलाब आणि झेंडूच्या पाकळ्यांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांचे औक्षण करून प्रत्येकाला साखर पेढा देण्यात आला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्राजक्ता मुळे व सीमा चौगुले-पाटील यांच्या हस्ते प्रतीकात्मक पुस्तक वितरण करण्यात आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना माजी ग्रंथपाल शंकर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव राठवळ यांनी केले. पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीबाबत माहिती दिली. सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकपाळ यांनी पाहुण्यांचा सत्कार व आभारप्रदर्शन केले.
प्राजक्ता मुळे आणि सीमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मनोगताच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या व नवे शैक्षणिक वर्ष प्रेरणादायी ठरो, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी परिसरातील पालकांची मोठी उपस्थिती होती. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
उत्साह, उमेद आणि आनंदाच्या वातावरणात नवे शालेय वर्ष स्वागताला सज्ज झाले, हे दृश्य विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा ठसा उमटवणारे ठरले.
कोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणूक, औक्षण व पुस्तकवर्षावाने उजळला ‘प्रवेशोत्सव’
|