बातम्या

शेतकरी आणि पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

Environment in shaktipit mahamarg


By nisha patil - 12/5/2026 8:18:25 AM
Share This News:



शेतकरी आणि पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध*

 विरोध डावलून संयुक्त मोजणी केल्यास लोकशाहीमार्गाने संघटितपणे विरोध करणार-कॉ. संपत देसाई

आजरा(हसन तकीलदार)*:- शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित अरेखनाची अधिसूचना जाहीर केली असल्याने संयुक्त मोजणी करण्याचे नियोजनही प्रशासनाच्या पातळीवर सुरु आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे या तालुक्यातील शेतकरी आणि पर्यावरण उध्वस्त होणार असल्याने शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती या महामार्गाला तीव्र विरोध करीत आहे.

शेतकरी तसेच पर्यावरण प्रेमिंचा विरोध डावलून संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तिव्र विरोध करून सरकारचा प्रयत्न हाणून पाडू आणि लोकशाही मार्गाने संघटितपणे लढा देऊ असे निवेदन आजरा तहसीलदार यांना शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले आहे.

  निवेदनात म्हटले आहे की, महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकाऊ जमीन संपादित होऊन शेतकऱ्यांची वडिलोपार्जित शेतजमीन जाणार आहे.

याबरोबरच पर्यावरणाची होणारी हानी आणि नद्याना येणारे पूर असे अनेक अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. कोणत्याही नागरिकांची शक्तिपीठ महामार्ग करावा अशी मागणी नाही उलट आहेत ते रस्ते चांगले आणि मजबूत करावेत. जंगल, जमीन आणि सर्वच नैसर्गिक संसाधनावर इथल्या भूमिपुत्रांचा अधिकार आहे.

मुळातच शक्तिपीठ महामार्गाची गरजच नसताना याचा अट्टाहास का? प्रत्येक किलोमीटरला 110 कोटी रुपये याप्रमाणे एक लाख कोटी रुपये इतका अवाढव्य खर्च करून सरकारला साध्य तरी काय करायचे आहे? शक्तिपीठ महामार्गाला समांतर असलेला नागपूर रत्नागिरी महामार्ग पूर्णत्वाकडे आला आहे. तो कोल्हापूर जवळून रत्नागिरी येथे मुंबई गोवा महामार्गाला मिळतो.

याचबरोबर कोल्हापूर येथून संकेश्वर बांदा या महामार्गातून खाली गोव्याला जोडणारा रस्ता असताना शक्तिपीठ महामार्गाची गरजच नाही. त्यामुळे या महामार्गाला विरोध रहाणार आणि विरोध डावलून संयुक्त मोजणी केल्यास लोकशाही मार्गाने संघटितपणे हाणून पाडू असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई (शेतकरी संघटना), युवराज पोवार राजू होलम, संजय सावंत, युवराज जाधव, कॉ. संजय घाटगे,वैभव देसाई, मारियान डिसोझा, श्रीपती गुरव, कॉ. काशिनाथ मोरे, विष्णू सुपल, भीमराव हळवणकर,कृष्णा सावंत,बाबुराव मालव, हरिश्चंद्र व्हराकटे, दिनेश कांबळे, दौलत राणे, अमित गुरव, वसंत पोतनीस,महेश पाटील,संजय पताडे, कृष्णा परीट, रविंद्र खोराटे नारायण कुंभार, रवींद्र भाटले, नामदेव गुरव आदींच्या सह्या आहेत.


शेतकरी आणि पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध
Total Views: 207