बातम्या

प्रत्येकाने जबाबदारी घेवून महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करा – आमदार राजेश क्षीरसागर

Everyone should take responsibility and improve


By nisha patil - 12/8/2025 2:49:58 PM
Share This News:



प्रत्येकाने जबाबदारी घेवून महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करा – आमदार राजेश क्षीरसागर

आमदार क्षीरसागर यांच्या आक्रमक भूमिकेसमोर अधिकारी निरुत्तर

कोल्हापूर दि. ११ : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करूनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे रखडत असल्याचा गंभीर सूर आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बैठकीत लावला. महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी कामकाजात शिस्त आणि जबाबदारी आणण्याच्या सक्त सूचना दिल्या.

आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत क्षीरसागर यांनी झोपडपट्टी कार्ड प्रकरण, घरफाळा, पाणीपुरवठा, ओपन स्पेस, रिक्त पदे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, अंधारलेले रस्ते, गांधी मैदानातील कामातील दिरंगाई, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांना जाब विचारला.

त्यांनी स्पष्ट केले की –

  • झोपडपट्टीवासीयांना मुलभूत सुविधा देणे हा त्यांचा हक्क असून, मोजणीसाठी आमदार फंडातून निधी देण्याची तयारी आहे.

  • महानगरपालिकेतील ३५० रिक्त पदांसाठी शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी तातडीने पाठपुरावा करावा.

  • शहरातील ओपन स्पेस ताब्यात घेऊन पार्किंग, क्रीडांगणे व उद्याने विकसित करावीत.

  • ड्रोन सर्व्हेक्षण करून घरफाळा योग्य दराने लागू करावा.

  • पाणीपुरवठ्यातील असमानता, चोरी व राजकारण थांबवावे.

  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार संपूर्ण वेतन द्यावे; अन्यथा ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत.

  • अंधारलेले पथदिवे तात्काळ सुरु करावेत, अंबाबाई मंदिर परिसरातील विद्युत खांब कार्यरत ठेवावेत.

  • गांधी मैदानातील कामातील दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.

  • सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर राजकीय दबाव न मानता कारवाई करावी.

तसेच बफर झोन व सेवा रुग्णालय प्रकरणावर निर्णय, सरस्वती टॉकीज व मध्यवर्ती बसस्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंग सुरु करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणे, रंकाळा म्युझिकल फाउंटनचे काम सुरू करणे आणि सी.एस.आर. निधीतून शहरातील चौक, उद्याने, शाळा, दवाखाने विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस उपायुक्त दरेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, नगररचना विभागाचे मस्कर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


प्रत्येकाने जबाबदारी घेवून महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करा – आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 46