बातम्या
*उत्तूर ता. आजरा येथे प्रथमच देहदानाचा आदर्श
By nisha patil - 5/10/2026 4:27:14 PM
Share This News:
*उत्तूर ता. आजरा येथे प्रथमच देहदानाचा आदर्श
*अनंत तिबिले यांनी सव्वा वर्षांपूर्वी केला होता देहदानाचा संकल्प
*आजरा(हसन तकीलदार):-. काही माणसं आयुष्यात फार काळ सोबत नसतात पण एखादी छोटीशी भेट, एखादा संवाद आणि एखादा विचार मनावर असा ठसा उमटवून जातात की त्यांची आठवण कायमची अमर राहते. असंच काहीसे उत्तूरच्या अनंत तिबिले यांनी आपल्या जीवनातून आणि आचरणातून दाखवून दिले आहे.
माणूस मरतो परंतु त्याचे विचार कधी मरत नाहीत, माणूस जातो पण त्याचे कार्य त्याला अमर करून जाते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले, जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले आणि हॉटेल व्यवस्थापक म्हणून काम करणारे उत्तूर ता. आजरा येथील अनंत तिबिले यांनी सव्वा वर्षांपूर्वी देहादान व अवयवदानाचा संकल्प केला होता. उत्तूर भागात अशा प्रकारचा संकल्प करणारे ते पहिलेच व्यक्ती म्हटले तर वावगे ठरणार नाही.
रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देहदानाचा संकल्प प्रत्यक्ष उतरल्याने त्यांच्या सामाजिक विचारांची, आचारांची परिसरात चर्चा सुरु झाली. त्यांनी देहादान करून केवळ आपले शरीर दान केलेले नाही तर समाजाला एक विचार, एक प्रेरणा आणि एक आदर्श देऊन गेले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुमूल्य मदत केली आहे.
आजरा नगरपंचातीचे कर्मचारी संतोष कांबळे यांनी देहदानाविषयी सांगितले त्यानंतर स्वप्नील ननवरे (अवयवदान जनजागृती व मदतनीस) यांच्याशी संपर्क साधून आपला देहदनाचा संकल्प सांगितला होता. त्याप्रमाणे त्यांनी आपले शरीर समाजाच्या उपयोगासाठी दिले. हेच त्यांच्या महानतेचे दर्शन घडवते. देहदान व अवयवदानाची नोंदणी केल्यानंतरसुद्धा पुढे अनंत तिबिले यांनी देहदान व अवयवदानाच्या जनजागृतीसाठी वाहून घेतले होते. ज्यांनी आयुष्यभर अवयवदान आणि देहदानाचा संदेश समाजात पोहचवण्यासाठी धडपड केली त्या कृतिशील व्यक्तिमत्वाने आज कायमचा निरोप घेतला असला तरी मृत्युनंतर शरीर जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्या शरीराचा समाजाच्या उपयोगासाठी अमर राहणार आहे. आज अनंत तिबिले शरीराने जरी जिवंत नसले तरी विचारांनी कायमस्वरूपी जिवंत राहणार आहेत.मरावे परी अवयवरुपी उरावे. हाच संदेश त्यांनी दिला आहे.
*उत्तूर ता. आजरा येथे प्रथमच देहदानाचा आदर्श
|