विशेष बातम्या
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित कागदपत्रांचे प्रदर्शन
By nisha patil - 5/11/2025 4:27:44 PM
Share This News:
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित कागदपत्रांचे प्रदर्शन
कोल्हापूर, दि. 5 : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुराभिलेख संचालनालय व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था कोल्हापूर याच्या संयुक्त विद्यमानाने 6 व 7 नोव्हेंबर या कालावधीत या नेत्यांशी संबंधित पुराभिलेख संचालनालयातील कागदपत्रांचे प्रदर्शन या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 11 वाजता श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या पुराभिलेख संचालनालयामार्फत दरवर्षी ऐतिहासिक विषयांवर आधारित ऐतिहासिक तसेच दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन इतिहास संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी व सर्वसामान्य व्यक्ती यांच्यासाठी भरविले जाते. यंदाच्या वर्षी या प्रदर्शनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेख संचालनालयाकडे उपलब्ध असणारी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, दस्तऐवज यांची मांडणी करण्यात आली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ब्रिटीश अधिका-यांशी झालेला पत्रव्यवहार, महात्मा गांधी यांचे विविध विषयांवरील तत्कालीन दैनिकामधून प्रसिद्ध झालेले मार्मिक लेख त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विविध कालखंडातील छायाचित्रे यांचादेखील समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे. ऐतिहासिक घटनांचा परामर्श घेणाऱ्या कागदपत्राचा व छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आलेला आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी इतिहासप्रेमी नागरिक, संशोधक, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व प्रदर्शनाचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी केले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित कागदपत्रांचे प्रदर्शन
|