शैक्षणिक

स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे विद्यापीठात प्रदर्शन सुरू

Exhibition of rare photographs of freedom


By Administrator - 8/8/2025 4:34:47 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. ८ ऑगस्टशिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती असणाऱ्या सुमारे २००० दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनास आज सकाळी प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात उद्यापर्यंत (दि. ९) हे प्रदर्शन सुरू राहील.

आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे येथील जयहिंद फौंडेशन आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे संकल्पक चंद्रकांत शहासने यांनी अथक परिश्रमातून संकलित व संग्रहित केलेल्या माहितीमधून संपूर्ण भारतातील क्रांतिकारकांची शौर्यगाथा या प्रदर्शनाद्वारे उलगडणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासी क्रांतिकारकांसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा विस्तृत आढावा या अंतर्गत घेण्यात आला आहे. या माध्यमातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, दिलेले बलिदान, दाखवलेले धैर्य आणि चिकाटी याचे एक प्रेरक चित्र या प्रदर्शनात मांडलेल्या माहितीफलकांमधून सामोरे येते. कोल्हापूर आणि परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकविद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शहासने आणि इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी केले आहे.


स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे विद्यापीठात प्रदर्शन सुरू
Total Views: 68