बातम्या

विवेकानंद मध्ये रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शनाचे आयोजन

Exhibition of wild vegetables and their recipes organized at Vivekananda


By nisha patil - 8/20/2025 5:35:02 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये  रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर, दि. 20 : “रानभाजी हा स्थानिक आहारातील महत्त्वाचा घटक असून त्यामध्ये पोषणमूल्याबरोबरच औषधी गुणधर्मही मोठ्या प्रमाणावर आढळतात. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून या परंपरेचे जतन करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेज मराठी विभागप्रमुख डॉ. ए. बी. आळवेकर यांनी केले.

विवेकानंद कॉलेज (अधिकार प्रदत्त स्वायत्त) येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रानभाज्यांचे व त्यांच्या पाककृतींचे आगळेवेगळे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. आळवेकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार होते.

या प्रदर्शनात कुर्डू, पात्री, शेवगा, तांदळी, घोळ, आंबुशी, करतुले अशा २५ पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता. भाज्यांचे औषधी गुणधर्म, पोषणमूल्य, वापराच्या पद्धती व पाककृती यांची माहिती माहितीफलकाद्वारे देण्यात आली.

पाककृतींचे परीक्षण प्रा. सई पाटील (गृहशास्त्र विभाग) आणि प्रा. वर्षा पवार (संख्याशास्त्र विभागप्रमुख) यांनी केले. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धन, स्थानिक ज्ञानाचे जतन आणि जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित होते असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आसावरी केसरकर व कु. सिद्धी कराळे यांनी केले. आयोजनात वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.


विवेकानंद मध्ये रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शनाचे आयोजन
Total Views: 307