राजकीय
सत्तेच्या राजकारणात फडणवीसांची पुनरागमनाची नोंद
By Administrator - 1/17/2026 12:10:36 PM
Share This News:
झंझावाती प्रचार, अचूक नियोजन आणि परिस्थितीनुरूप घेतलेले निर्णय यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेतृत्व पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केले आहे. परंपरागत मित्र असलेले ठाकरे गट सोबत नसताना, तसेच शिवसेना (शिंदे गट) अपेक्षेइतकी चमकदार कामगिरी करू न शकल्याच्या पार्श्वभूमीवर मिळवलेला हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरतो.
महाराष्ट्रातील नागरी भागातील २९ पैकी २५ महानगरपालिकांमध्ये मिळवलेले यश, तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याची स्पष्ट झालेली शक्यता, हे या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. ज्या शहरात भारतीय जनता पक्षाचा राजकीय प्रवास सुरू झाला, त्याच मुंबईत आता भाजपचा महापौर बसणार, ही घटना राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक मानली जाईल.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागलेले देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. त्या काळातील राजकीय धक्क्यांमधून त्यांनी घेतलेला अनुभव आणि त्यातून घडवलेली रणनीती याचे प्रतिबिंब या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. गेल्या दहा दिवसांत त्यांनी केलेला झंझावाती प्रचार, दररोज रात्री उशिरा मुंबईत परतून उमेदवारांच्या आढाव्यासाठी घेतलेल्या बैठका, सहकारी पक्षांच्या चुका संयमाने हाताळत केलेली दुरुस्ती, तसेच लातूरमध्ये जाऊन घेतलेली जबाबदारीची भूमिका — या सर्व बाबींनी त्यांच्या नेतृत्वातील परिपक्वता अधोरेखित केली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील यशाचीच पुनरावृत्ती यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून झाली. काही ठिकाणी सहकारी नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका मर्यादित राहिली असताना, फडणवीस यांनी राज्यभरात संतुलित आणि धोरणात्मक भूमिका घेतली. मुंबईत शिंदे गटाला न दुखावता जागावाटप, नवी मुंबईत थेट आव्हान, कल्याण-डोंबिवलीत संयम, तर ठाण्यात मोकळीक — या सर्व बाबींमधून त्यांनी राजकीय समन्वयाचे कौशल्य दाखवून दिले.
फडणवीस निर्णय एकहाती घेतात, अशी टीका यापूर्वी होत असली तरी या निवडणुकीत त्यांनी संघटनात्मक नेतृत्वाला प्राधान्य दिले. मुंबईसाठी आशिष शेलार आणि अमित साटम, तर राज्यपातळीवर चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण यांच्यासह टीम उभी करून त्यांनी निवडणुकीची प्रभावी ‘स्क्रिप्ट’ लिहिली. माध्यमांशी साधलेला संयत संवाद, सेलिब्रिटींचा प्रभावी वापर आणि विरोधकांवर वैयक्तिक टीका टाळण्याची भूमिका यामुळे भाजपची प्रतिमा सकारात्मक राहिली.
केंद्रीय नेत्यांचा फारसा सहभाग नसतानाही, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करत फडणवीस यांनी पक्षाला निर्णायक विजय मिळवून दिला. त्यामुळेच या निवडणुकीचे श्रेय मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे केवळ विजयी नेते नव्हे, तर या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत.
सत्तेच्या राजकारणात फडणवीसांची पुनरागमनाची नोंद
|