बातम्या
भाईंदरमधल्या कुटुंबाला अन्नातून विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, इतर रुग्णालयात उपचाररत
By Administrator - 8/9/2025 5:38:53 PM
Share This News:
भाईंदरमधल्या कुटुंबाला अन्नातून विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, इतर रुग्णालयात उपचाररत
भाईंदरमधल्या बजरंग नगरमध्ये एका कुटुंबातील पाच जण अचानक आजारी पडले. यात तीन वर्षीय दिपाली मोर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की रविवारी संध्याकाळी मुलीच्या वडिलांनी बाजारातून चिकन आणले होते, जे घरी शिजवून संपूर्ण कुटुंबाने रात्रीच्या जेवणात भात, उकडलेली अंडी आणि वडापावसोबत घेतले. त्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीची लक्षणे दिसली.
रमेश मोर्या, नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्यांवर मीरा भाईंदरमधल्या डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाहत मोर्या आणि अनामिका मोर्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले.
भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी सांगितले की, चिमुकलीचा शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा असल्याचे आढळले आहे. विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने प्रकरण संशयास्पद मानून पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे.
भाईंदरमधल्या कुटुंबाला अन्नातून विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, इतर रुग्णालयात उपचाररत
|