बातम्या
*सलग आठवडाभर पोळगाव, खानापूरमध्ये हत्तीचा वावर भीतीच्या छायेखाली शेतकरी व नागरिक
By nisha patil - 1/16/2026 4:33:33 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील पोळगाव, खानापूर आणि कासार कांडगाव भागात सलग आठ ते दहा दिवस झाले रात्री हत्तीचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत हत्ती चक्क पोळगाव रस्त्यावरील मेसकाठ्यांचा आस्वाद घेत बिनधास्त उभा होता. त्यामुळे येथील रहिवासी आणि शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत.
काल रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास सूर्याजी नार्वेकर यांच्या घराच्या बाजूला पोळगाव पुलाच्या अलीकडे आजरा साखर कारखान्याच्या पोळगाव शेती सेंटर ऑफिस समोर हत्ती पुन्हा आला. या पुलाजवळ असणारे दिशादर्शक व माहिती फलकाला आपले शरीर घासून नंतर ते फलक उखडून टाकले आणि रस्त्याच्या बाजूला असणारे बांबू खाऊ खाऊ लागला. त्यानंतर जाकू मोती कुतिन्हो यांची केळीची झाडे, ऊसपिक आणि लावलेल्या काजू रोपांचे नुकसान केले. वन खात्याचे कर्मचारी सेंटर ऑफिसजवळ शेकोटी पेटवतात आणि हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्यांनाही काही मर्यादा येताना दिसत आहेत. यासाठी वनखात्याने तज्ञाचे मार्गदर्शन घेऊन यावर तातडीने उपाय योजना आखून हत्तीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. वाण्याप्रण्यांच्या या नुकसानीला कंटाळून काही शेतकरी म्हणत आहेत की सरकारने आम्हांला खंड देऊन जमिनी सरकारने कसाव्या. असे म्हणत आपला उद्रेक जाहीर केला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. नुकसान ग्रस्त ऊस बागायतदार शेतकरी कुतिन्हो यांच्या ऊस प्लॉटला आजरा साखर कारखान्याचे ऍग्रीओव्हसिअर अरुण माडभगत, गटप्रमुख फारूक मुजावर आणि उत्तम नार्वेकर यांनी भेट देऊन ऊस तोडीसाठी टोळीचे नियोजन करीत असलेबाबत सांगितले.पिकांचे झालेले नुकसान पाहून कुतिन्हो यांच्या डोळ्यात दुःख दिसत होते.
*सलग आठवडाभर पोळगाव, खानापूरमध्ये हत्तीचा वावर भीतीच्या छायेखाली शेतकरी व नागरिक
|