कृषी
विविध मागण्यासाहीत वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
By nisha patil - 10/14/2025 12:44:37 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, किटवडे, आंबाडे येथील भागामध्ये हत्ती,गवे,रानडुक्कर, माकडे अशा वन्यप्राण्यामुळे शेतीचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेमुळे आपल्या विविध मागण्यासहीत हत्ती व इतर वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तबरोबर इतर मागण्यासाठी वेळोवेळी वनविभागाला लेखी व तोंडी सूचना देऊनसुद्धा यावर वन विभागाकडून कोणतीही उपाययोजना आखली गेली नसल्याने या भागातील शेतकरी व नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे.
आजऱ्याच्या पश्चिम भागात जून 2025 पासून हत्तीचा वावर असून शेतकऱ्याकडून वारंवार तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांची भातशेती, ऊसशेती, मेसकाठी, काजू, केळी यां पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. हत्तीच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे. वारंवार लेखी व तोंडी मागणी करुनसुद्धा वनविभागाने हत्ती घालवण्यासाठी कोणतीही उपाययोजना आखलेली दिसून येत नाही.
यासाठी आपल्या विविध मागण्यासहीत येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे. वन विभागाच्या वतीने वरिष्ठ वनअधिकारी विलास काळे यांनी आंदोलनकर्त्याशी संवाद साधला परंतु यातून काहीही तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. साहेब आम्हाला निसर्गाने मारलं आता वन्य प्राण्यांच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत. हत्ती, गवे, रानडुकरे आणि माकडे यांच्यासाठीच आम्ही शेती करायची का? मिळणारी नुकसान भरपाईसुद्धा तुटपुंजी आहे.
वारंवार मागणी करूनही या प्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर आम्ही करायचे काय? आमचं अस्तित्व अक्षरशः संपलं आहे. पावसातून शेती वाचवायचा प्रयत्न केला तर शिल्लक शेती हे वन्यप्राणी संपवत आहेत. मोर्चाचे हत्यार उपसल्याशिवाय वनविभागाला जाग येत नाही का? असे प्रश्न करीत शेतकरी संतप्त झाले.
जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेण्यात आली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक गोविंद पाटील, संग्राम पाटील, जयसिंग पाटील, साईनाथ तांबेकर, भास्कर पाटील, प्रवीण मटकर, धाकू पाटील, नागेश सावंत, सहदेव प्रभू, चंद्रकांत जाधव, गंगाराम डेळेकर, रामचंद्र मटकर, रविकांत अडकूरकर, लक्ष्मण खरुडे, पंकज पाटील, शुभम सुतार, बाळासाहेब म्हासरंगकर, बाळासाहेब पाटील, सागर मांडवकर, संजय अडकूरकर, नितीन पाटील,यशवंत पाटील यांच्यासह घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, किटवडे, आंबाडे येथील शेतकरी आंदोलनात सामील झाले आहेत.
विविध मागण्यासाहीत वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
|