बातम्या

ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक; स्वाभिमानीच्या मुरगूड ते कागल लाँग मार्चला उत्स्फूर्त प्रारंभ

Farmers take an aggressive stance over sugarcane prices


By nisha patil - 10/31/2026 2:24:40 PM
Share This News:



ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक; स्वाभिमानीच्या मुरगूड ते कागल लाँग मार्चला उत्स्फूर्त प्रारंभ
 

मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देणार; हजारो ऊस उत्पादक सहभागी

कागल प्रतिनिधी : अजित बोडके मुरगूड / कागल, ता. ३१ : चालू गळीत हंगाम सन २०२५-२६ मधील ऊसाला योग्य व उच्चांकी दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुरगूड ते कागल आत्मक्लेश लाँग मार्च पदयात्रेला आज शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला.

सकाळी ठीक ९ वाजता शिवतीर्थ, मुरगूड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर घोषणाबाजी करत पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो", "एकजूट दाखवूया, हक्काचा दर घेऊया" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या लाँग मार्चचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून, या पदयात्रेत मुरगूड, कागल परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

बैठकीत तोडगा न निघाल्याने लाँग मार्चचा निर्णय

ऊस दराचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात काल शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना व साखर कारखानदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ऊस दराबाबत अंतिम तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडण्यासाठी या लाँग मार्चचे आयोजन केले आहे.

पदयात्रेचा मार्ग -

सदर पदयात्रा मुरगूड (शिवतीर्थ) - भडगाव - केनवडे फाटा मार्गे कागल येथे जाणार आहे. कागल येथे पोहोचल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जाऊन संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा व सन्मानाने जगता यावे यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या पदयात्रेमुळे मुरगूड - कागल मार्गावर शेतकऱ्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले आहे.


ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक; स्वाभिमानीच्या मुरगूड ते कागल लाँग मार्चला उत्स्फूर्त प्रारंभ
Total Views: 24