बातम्या
ऊसदरासाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ! ₹५० साखर, ₹७० मोलॅसिसचा आग्रह
By nisha patil - 8/10/2026 3:09:11 PM
Share This News:
ऊसदरासाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ! ₹५० साखर, ₹७० मोलॅसिसचा आग्रह
कर्नाटक राज्य रयत संघ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कागवाड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कर्नाटक रयत संघाचे अध्यक्ष चुन्नापा पुजारी, शशिकांत गुरूजी, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक २५ व्या रौप्य महोत्सवी ऊस परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ऊसदराच्या प्रश्नावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत यंदा उच्चांकी ऊसदर घेतल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून साखरेचा हमीभाव ५० रुपये प्रतिकिलो आणि सी-हेवी मोलॅसिसचा दर ७० रुपये प्रतिलिटर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या मागण्या मान्य होईपर्यंत ऊस कारखाने सुरू न करण्याचा निर्धारही मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, कारदगा (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेनिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला. गेल्या चार वर्षांत एफआरपीमध्ये झालेली वाढ मोठ्या प्रमाणात तोडणी-वाहतूक खर्चात गेल्याचा दावा यावेळी करण्यात आला. खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरी तसेच इतर निविष्ठांच्या वाढत्या दरामुळे ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. केंद्र सरकारने साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नात तातडीने लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ऊसदरासाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ! ₹५० साखर, ₹७० मोलॅसिसचा आग्रह
|