कृषी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांचा इशारा; शरद सहकारी आणि घोडावत जागरी कारखान्यांना निवेदन

Farmers warn of sugarcane price hike


By nisha patil - 11/14/2025 11:39:28 AM
Share This News:



शरद सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी जाहीर केलेला 3400 रुपये प्रति टन ऊसदर शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऊस आंदोलनात झालेल्या तोडग्यानुसार शरद सहकारी साखर कारखान्याने एकरकमी 3450 रुपये प्रति टन तसेच हंगाम संपल्यानंतर अतिरिक्त 50 रुपये प्रति टन दर जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

याचबरोबर कारखान्याचे चेअरमन आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घोडावत जागरी खाजगी कारखान्यानेही याच प्रमाणे दर जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, मागील गळीत हंगामातील हिशोबात राहिलेल्या 90 रुपयांच्या फरकाचा दुसरा हप्ता व्याजासह देणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी अजूनही त्या फरक रकमेची प्रतीक्षा करत असल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. तसेच कारखाना प्रशासनाने क्रम पाळी पत्रक सार्वजनिक करावे, एन्ट्री आणि खुशाली संदर्भात स्पष्ट परिपत्रक काढावे, तसेच 25 किलोमीटरच्या आतील ऊस प्राधान्यक्रमाने तोडावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारखान्यांच्या अंतर्गत कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना शेतकरी वर्गात वाढत असून ही व्यवस्था तातडीने सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

निवेदन देताना शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला की, शरद सहकारी साखर कारखाना आणि घोडावत जागरी कारखान्याने मागील फरकाचा हिशोब आणि सुधारित ऊसदरासंदर्भात कोणतेही परिपत्रक काढले नाही तर कारखान्यांच्या गेटवर ऊस वाहतूक रोखून तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, योग्य दर न मिळाल्यास त्यांच्या कष्टाचे आणि उत्पादन खर्चाचे नुकसान होत असून त्यांना न्याय मिळावा यासाठी आता निर्णायक पावले उचलावी लागतील. या निवेदनावेळी अंकुश संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, अमोल गावडे, संभाजी माने, दत्तात्रेय जगदाळे, बंडू होगले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.


ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांचा इशारा; शरद सहकारी आणि घोडावत जागरी कारखान्यांना निवेदन
Total Views: 18