बातम्या
पन्हाळा परिसरात छोटा हत्ती आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By nisha patil - 11/16/2026 10:05:53 PM
Share This News:
पन्हाळा परिसरात छोटा हत्ती आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार; पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल
पन्हाळा प्रतिनिधी, शहानवाज मुजावर पन्हाळा परिसरात छोटा हत्ती वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमींना मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याची तक्रार पन्हाळा पोलिसांत दाखल झाली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कोतोली ते कोतोली फाटा मार्गावर हा अपघात झाला. होंडा शाइन दुचाकी (एमएच ०९ एफएक्स ७८६४) आणि छोटा हत्ती वाहन (एमएच ०९ जीजे ४४८२) यांच्यात धडक झाली. छोटा हत्ती वाहनाचे चालक दत्तात्रय बाबासो पाटील यांनी दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या अपघातात मोहन दामाजी कुंभार (वय ५८, रा. पन्हाळा) आणि पांडुरंग सर्जेराव काशीद (वय ५१, रा. पन्हाळा) यांचा मृत्यू झाला. तर अभिजित विलास काशीद (वय ३५) आणि सागर यशवंत चोगले (वय ४२, रा. पन्हाळा) हे दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर वाहनचालकाने जखमींना मदत न करता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून वाहनासह पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २००/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम. एम. नाईक हे गुन्ह्याचे फिर्यादी असून पोलीस उपनिरीक्षक एस. सी. सनदी तपास करीत आहेत.
पन्हाळा परिसरात छोटा हत्ती आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
|