बातम्या
कांबळे दांपत्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींची धिंड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
By nisha patil - 11/21/2025 3:19:38 PM
Share This News:
कांबळे दांपत्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींची धिंड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
पुलाची शिरोली : प्रतिनिधी पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा हल्लेखोरांची गुरुवारी पोलिसांनी धिंड काढली. पूर्ववैमनस्यातून दिगंबर व आरती कांबळे दांपत्यावर तसेच त्यांच्या मुलगा वल्लभवर प्राणघातक हल्ला करणारे हे चारही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, वडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनाक्रम : अचानक घातक हल्ला
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या कांबळे दांपत्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला. वैभव राजू बेडेकर (25), आर्यन अनिल शिंदे (18), साहिल अरुण बनगे (22) आणि साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक (21) यांनी हातातील धारदार ऐडक्यांच्या सहाय्याने परिसरात दहशत माजवत दांपत्यावर वार केले.
या हल्ल्यात दिगंबर कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हातावरील वारांमुळे काही बोटे तुटली आहेत. आरती कांबळे यांच्याही शरीरावर गंभीर जखमा झाल्या. मुलगा वल्लभ याने धावत सुटून जीव वाचवला.
अटक आणि धिंड
हल्ल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाले होते. मात्र, शिरोली पोलिसांनी बुधवारी कागल येथे शोधमोहीम राबवत चारही आरोपींना अटक केली. गुरुवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या हातांना दोरी बांधून परिसरातून फिरवत पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईचे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.
पुढील तपास सुरू
या प्रकरणी शिरोली पोलिसांकडून पुढील तपास जोरात सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी आणि आणखी कोणी गुन्ह्यात सामील आहे का याचा तपासही करण्यात येत आहे.
कांबळे दांपत्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींची धिंड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
|