बातम्या

वाघाच्या डरकाळीने वझरे ग्रामस्थांत भीती

Fear of tiger strikes fear among villagers


By Administrator - 9/3/2026 3:15:14 PM
Share This News:



वाघाच्या डरकाळीने वझरे ग्रामस्थांत भीती

डरकाळी ऐकून ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची पाचावर धारण

आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यातील वझरे गावच्या परिसरात वनविभागाने तयार केलेल्या वनतळींची पाहणी करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू आहे. वझरेपैकी खोतवाडी येथे ही पाहणी सुरू असताना लगतच्या जंगलातून वाघाची डरकाळी ऐकू आल्याने ग्रामपंचायत अधिकारी सुहास देसाई व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली.

ही बातमी वाऱ्यासारखी खोतवाडी व वझरे परिसरात पसरल्यानंतर वझरे ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.हत्ती, रानडुकरे, गवे या प्राण्याबरोबरच आता वाघाची चाहूल लागल्याने शेतकरी व ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
     

याबाबत मिळालेली माहिती अशी, वझरे ते पेरणोली या दोन गावांदरम्यान घनदाट जंगल आहे. या जंगलात वनविभागाकडून ठिकठिकाणी वनतळी खुदाई करण्यात आली आहे. याठिकाणी पाणी पिण्यासाठी जंगली प्राणी येत असतात.येथे रानडुकरे, गवे यासारख्या वन्याप्राण्यांचे दर्शन नित्याचेच आहे.
 

आठ दिवसांपूर्वी खोतवाडी गावालगतच्या जंगलातून सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या तीन महिलांनाही वाघाची डरकाळी ऐकू आली होती. वाघाची डरकाळी ऐकून भीतीने वझरे गावच्या दिशेने धावत येताना हातातील कोयता एका महिलेच्या पायावर पडून ती महिला जखमी झाली होती. आठ दिवसानंतर त्याच परिसरात ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना डरकाळी ऐकू आल्यामुळे महिलांनी ऐकलेली वाघाची डरकाळी खरी ठरल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.
 

 वझरेपैकी खोतवाडी लगतच्या  जंगलातील वनतळ्यांची पाहणी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी सुहास देसाई, कर्मचारी उमेश पाटील तसेच गावातील काही ग्रामस्थ गेले होते. पाहणी करीत असताना या परिसरातच वाघाची डरकाळी ऐकू आली, डरकाळी ऐकून सर्वांची पाचावर धारण बसली.पाहणीचे काम सोडून त्यांनी जीव मुठीत घेऊन तेथून काढता पाय घेतला. खोतवाडी येथे येऊन त्यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली. दोनच दिवसांपूर्वी चिमणे येथील अनिल चव्हाण यांच्या कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे वाघासोबतच या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. वाघाचा वावर वाढल्याने वझरे, पेरणोली, महागोंड, वडकशिवाले, चिमणे या आजरा तालुक्यातील गावांसह भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी व बेडीव या गावांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे.
   

शिरसंगी भागात हत्ती आणि वझरे भागात वाघ अशा परिस्थितीत तेथील ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीच्या छायेखाली जगत आहेत.शेतात जायचे कसे? या विवंचनेत शेतकरी आणि गुराखी आहेत. हा बिबट्या आहे की वाघ याची खतरजमा करण्यात वनविभागाचे कर्मचारी लागल्याचे समजते.वनविभागाने तातडीने यावर उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.


वाघाच्या डरकाळीने वझरे ग्रामस्थांत भीती
Total Views: 332