बातम्या
जनगणनेत प्रत्येकाची माहिती अचूक भरा; रमेश भोसलेंचा प्रगणकांना इशारा
By nisha patil - 11/18/2026 10:02:32 PM
Share This News:
जनगणनेत प्रत्येकाची माहिती अचूक भरा; रमेश भोसलेंचा प्रगणकांना इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून, प्रगणकांनी प्रत्येक व्यक्तीची माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी. या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई आणि दंड होऊ शकतो, असा इशारा जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना रमेश भोसले बोलत होते.
या जनगणना प्रक्रियेला १० जानेवारी २०२७ पासून सुरुवात होणार आहे. १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वगणनेची प्रक्रिया राबवली जाणार असून, २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत. तर १ ते ५ मार्चदरम्यान पुनर्परीक्षण केले जाणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती CMMS पोर्टलवर अचूकपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे. तसेच ८०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटांचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश भोसले यांनी दिले.
जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सेन्सस ॲक्टमधील कलम ११ अंतर्गत कारवाई किंवा दंड होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रशिक्षणाला जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जनगणनेत प्रत्येकाची माहिती अचूक भरा; रमेश भोसलेंचा प्रगणकांना इशारा
|