बातम्या
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत रिक्त पदे तातडीने भरा – भाजप सहकार आघाडीची मागणी
By Administrator - 5/3/2026 5:07:00 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत रिक्त पदे तातडीने भरा – भाजप सहकार आघाडीची मागणी
कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वाढत्या प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या पदांची नोकरभरती प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी भाजप सहकार आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन आघाडीचे अध्यक्ष सुधीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा बँक ही जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असून गेल्या काही काळापासून अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत असून त्याचा परिणाम बँकेच्या सेवा आणि ग्रामीण भागातील सभासदांच्या कामकाजावर होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच बँकेची प्रगती आणि ग्राहकांचे हित लक्षात घेता भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रमुख मागण्या :
* बँकेतील लिपिक, शिपाई व तांत्रिक विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत.
* भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित असावी.
* ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी द्यावी.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी हे निवेदन संचालक मंडळासमोर ठेवून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भाजप सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक सुरेश घाडगे, सरचिटणीस सुधीर बोलावे, जयेंद्र भोसले, उपाध्यक्ष अनिल कोळेकर, ईश्वरा पाटील, प्रसाद खोत, रवींद्र धडके, आशिष माळी, प्रशांत देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत रिक्त पदे तातडीने भरा – भाजप सहकार आघाडीची मागणी
|