राजकीय
अखेर भाजप–शिंदे शिवसेनेचा जागा वाटप फॉर्म्युला ठरला
By nisha patil - 12/26/2025 12:44:38 PM
Share This News:
मुंबई :- बहुचर्चित मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक 2026 साठी अखेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकीनंतर युतीतील जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड असून, त्यापैकी भाजप 140 जागांवर निवडणूक लढवणार, तर शिवसेना (शिंदे गट) 87 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. याशिवाय आरपीआयला भाजपच्या कोट्यातून काही जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून 150 जागांची मागणी होती, मात्र अखेर 140 जागांवर समाधान मानावे लागल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिका ही राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत 2022 नंतरच्या राजकीय घडामोडींमुळे समीकरणे बदलली आहेत. सध्या मुंबईत भाजपचे 15 आमदार, उद्धव ठाकरे गटाचे 10 आमदार, तर शिंदे शिवसेनेचे 6 आमदार आहेत.
अलीकडे झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने, येणारी पालिका निवडणूक ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, विधानसभा निहाय वॉर्ड वाटप आणि उमेदवारांची नावे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
अखेर भाजप–शिंदे शिवसेनेचा जागा वाटप फॉर्म्युला ठरला
|