बातम्या
बाळूमामा देवस्थानच्या आर्थिक गैरव्यवहाराला वेग; 60.74 कोटींच्या प्रकरणात 5 जण अटकेत
By nisha patil - 9/24/2026 3:37:39 PM
Share This News:
बाळूमामा देवस्थानच्या आर्थिक गैरव्यवहाराला वेग; 60.74 कोटींच्या प्रकरणात 5 जण अटकेत
आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. लेखापरीक्षणात तब्बल 60 कोटी 74 लाख रुपयांच्या कथित आर्थिक अपहाराची नोंद झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली आहे. या प्रकरणात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपावरून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भीष्म सूर्यवंशी, रणजित सूर्यवंशी, प्रकाश मांगले, सागर शिंदे आणि तन्मय बाचणकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, प्रकरणातील तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 31 ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आर्थिक गुन्हे शाखेकडून ट्रस्टच्या जमीन व्यवहारांसह निधीचा वापर, आर्थिक कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. काही संबंधित ट्रस्टी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती असून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आता या तपासातून 60 कोटी 74 लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप काय? या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि ट्रस्टच्या निधीमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने अनियमितता झाली? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे भाविक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बाळूमामा देवस्थानच्या आर्थिक गैरव्यवहाराला वेग; 60.74 कोटींच्या प्रकरणात 5 जण अटकेत
|