शैक्षणिक
आर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदे
By Administrator - 11/4/2026 4:19:17 PM
Share This News:
आर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदे
विद्यापीठाच्या हिंदी विभागात Institution’s Innovation Council च्या संयुक्त विद्यमाने नव उद्योजक व स्टार्ट-अप साठी विशेष व्याख्यान
कोल्हापूर : आर्थिक साक्षरता काळाची गरज बनल्याचे प्रतिपादन करत असताना, पैसा कमवण्याबरोबरच तो योग्य पद्धतीने वाचविणे, वाढविणे आणि खर्च करणे गरजेचे असते. त्यासाठी नव उद्योजक व सर्वांसाठीच आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची असते. आपल्या देशामध्ये आर्थिक साक्षरतेचाच मोठा अभाव असल्याचे दिसून येते. असे मत कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटीचे प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात शुक्रवारी ‘नव उद्योजक आणि स्टार्टअपसाठी आर्थिक साक्षरता’ विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभागाच्या विभाग प्रमुख तृप्ती करेकट्टी होत्या.
यावेळी डॉ. शिंदे म्हणाले की, आपल्या जीवनामध्ये स्थैर्य पाहिजे असेल तर उत्पनाचे एकापेक्षा जास्त मार्ग असले पाहिजेत. त्याचबरोबर खर्चाचा 50-30-20 चा फॉर्मूला वापरला पाहिजे. म्हणजेच एकूण उत्पन्नाच्या 50 टक्के खर्च गरजेच्या वस्तुवर, 30 टक्के खर्च इच्छा पूर्ण करण्यासाठी व 20 टक्के ही आपली प्रत्येक महिन्याला बचत झालीच पाहिजे. ही बचत वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवली पाहिजे. तसेच आपण नव उद्योजक होऊ इच्छित असाल तर अगोदर स्वत: मेहनत केली पाहिजे. यावेळी त्यांनी बचत व गुंतवणूक, मच्युअल फंड, कर्ज व्यवस्थापन, आर्थिक शिस्त व त्याचे नियम यासंदर्भात विस्ताराने माहिती देऊन नव उद्योजकांनी आपला उद्योग यशस्वी करण्यासाठी काय-काय केले पाहिजे? यासंदर्भात टिप्सही दिल्या.
यावेळी डॉ. तृप्ती करेकट्टी यांनीही गुंतवणूक कशी व कोठे करावी? भविष्यात चांगले जीवन जगायचे असेल तर आतापासूनच त्याची सुरुवात कशी करावी, रियल इस्टेटमधील गुंतवणूक कशी फायद्याची ठरते इत्यादी संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे इन्होव्हेशन अम्बेसिडर डॉ. हर्षवर्धन पंडित यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत देसाई यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश निकम यांनी करून दिला. आभार डॉ. जयसिंग कांबळे यांनी मानले. यावेळी डॉ. अनिल मकर, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदे
|