विशेष बातम्या

मध्य प्रदेशातून राजस्थानात वाघिणीचे एअरलिफ्ट; देशातील पहिलीच ऐतिहासिक घटना

First historic operation in the country


By nisha patil - 12/23/2025 11:04:38 AM
Share This News:



देशात प्रथमच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाघिणीचे हवाई मार्गाने स्थलांतर करण्यात आल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून एका वाघिणीला राजस्थानात सुरक्षितपणे एअरलिफ्ट करण्यात आले असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

ही वाघीण एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पेंच येथून थेट जयपूर येथे आणण्यात आली. सुमारे २ तास ३० मिनिटांचा हा हवाई प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर वाघिणीला रस्तेमार्गे राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आले.

रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवणे आणि विशेषतः जनुकीय विविधता सुधारण्याच्या उद्देशाने हे स्थलांतर करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या नियोजित स्थलांतरामुळे प्रकल्पातील वाघांची दीर्घकालीन टिकावू लोकसंख्या निर्माण होण्यास मदत होते.

दरम्यान, वाघिणीच्या सुरक्षिततेसाठी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वाघिणीला रेडिओ कॉलर बसवण्यात आला असून, एआय आधारित कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून तिच्यावर २४ तास देखरेख ठेवली जाणार आहे. वन विभागाकडून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही मोहीम यशस्वी झाल्याने भविष्यात देशातील इतर व्याघ्र प्रकल्पांमध्येही अशाच प्रकारच्या वैज्ञानिक पद्धतीने स्थलांतर मोहिमा राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मध्य प्रदेशातून राजस्थानात वाघिणीचे एअरलिफ्ट; देशातील पहिलीच ऐतिहासिक घटना
Total Views: 40