कोल्हापूर:- चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षेत मुकुंद अगिवाल यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. The Institute of Chartered Accountants of India (ICAI) यांनी जाहीर केलेल्या सप्टेंबर २०२५ सत्राच्या निकालानुसार, मुकुंद अगिवाल यांनी एकूण ८३.३३ टक्के गुण मिळवून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रात उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.
याच निकालात मुंबईतील नील राजेश शाह यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत देशात तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राचा मान वाढवला आहे. फाउंडेशन परीक्षेतील स्पर्धेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून नील शाह यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या परिश्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ICAI ने या निकालांसह फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम या तीनही स्तरांच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. अंतिम परीक्षेत ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मिळून एकूण १६,८०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुकुंद अगिवाल आणि नील शाह यांच्या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोघांनीही कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिस्त यांमुळे हे यश मिळविल्याचे सांगितले जाते.
या निकालामुळे देशभरातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुकुंद अगिवाल आणि नील शाह यांचे यश मार्गदर्शक ठरणार आहे.