शैक्षणिक
उत्तरपत्रिकेत चारऐवजी पाच पर्याय
By nisha patil - 12/25/2025 2:57:11 PM
Share This News:
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. उत्तरपत्रिकेत चारऐवजी आता पाच पर्याय असतील, तसेच उत्तरपत्रिकेची दोन भागांत विभागणी करण्यात येणार आहे. हे सर्व बदल १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व एमपीएससी परीक्षांसाठी लागू राहणार आहेत.
आयोगाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, उत्तरपत्रिकेचा भाग-१ उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी वापरायचा असून, भाग-२ मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय सांकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी यासारखी वैयक्तिक माहिती असेल.
परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकांकडून उत्तरपत्रिकेचे दोन्ही भाग वेगळे करण्यात येतील. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता आणि पारदर्शकता राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उमेदवारांचा बैठक क्रमांक आता ८ अक्षरीऐवजी ७ अंकी असणार असून, हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीअंतर्गत संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहील, असे आयोगाने नमूद केले आहे.
पाचवा पर्याय अनिवार्य
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय देण्यात येणार आहेत. उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, तरीही पाचवा पर्याय निवडणे अनिवार्य असेल. प्रत्येक प्रश्नासाठी पाचपैकी एक तरी वर्तुळ छायांकित करणे आवश्यक असून, कोणतेही वर्तुळ न रंगवल्यास त्या प्रश्नासाठी २५ टक्के (१/४) गुण वजा केले जाणार आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उत्तरपत्रिकेत चारऐवजी पाच पर्याय
|