विशेष बातम्या

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Five records of Mahavitaran


By nisha patil - 12/8/2025 2:54:20 PM
Share This News:



महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई,  – शून्य विद्युत अपघातासाठी राबवलेल्या जनजागृती अभियानात लोकसहभागातून महावितरणने पाच नवीन विक्रम नोंदवत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. सोमवारी (दि. ११) दोन्ही संस्थांच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा गौरव करण्यात आला.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून हे अभियान पार पडले. त्यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून, “हा सन्मान लोकसहभागाचा आहे,” असे सांगितले.

मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा मयंक शाह यांनी विक्रमांची घोषणा केली. त्यांनी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, प्रसाद रेशमे, स्वाती व्यवहारे यांना प्रमाणपत्रे व सन्मानपदके प्रदान केली.

संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले की, लोकसहभागातून शून्य विद्युत अपघात अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, या अभियानाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल.

अभियानातील ठळक विक्रम (१ ते ६ जून २०२५)

  • मॅरेथॉन – ११,८८१ सहभागी

  • ऑनलाइन प्रश्नमंजुषा – ९६,१५० सहभागी

  • शालेय निबंध व चित्रकला स्पर्धा – ७,५९३ सहभागी

  • विद्युत सुरक्षा रॅली – २७,१५५ सहभागी

  • विद्युत सुरक्षेची शपथ (६ जून) – ४२,२०१ सहभागी

याशिवाय, १.९२ कोटी ग्राहकांना एसएमएसद्वारे आणि ३५.७३ लाख ग्राहकांना ईमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश पाठविण्यात आला. एकूण २.११ लाखांहून अधिक नागरिक, विद्यार्थी, अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

भारत सरकारकडे नोंदणीकृत आणि वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीशी संलग्न एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रॅली, मॅरेथॉन, शपथ, ऑनलाइन प्रश्नमंजुषा आणि ग्राहक संवाद या पाच उपक्रमातील लोकसहभागाची नोंद घेण्यात आली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर एशिया बुक ऑफ रेकॉर्डने आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार परीक्षण करून विक्रम अधिकृत घोषित केले.

या कार्यक्रमास मुख्य अभियंते मनीष वाठ, दत्तात्रेय बनसोडे, प्रशांत दानोळीकर, हरिश गजबे, वादिराज जहागिरदार, दीपक कुमठेकर, मिलिंद दिग्रसकर, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी अभियानाची माहिती दिली, तर डॉ. संतोष पाटणी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.



महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
Total Views: 53